अवयवदानातून अमरावतीत फुलणार अनेकांचे आयुष्य
आ.सुलभाताई खोडके यांच्या हस्ते उद्घाटन

अमरावती/3 ऑगस्ट -एका माणसाच्या दातृत्वातून दुसर्या गरजू रुग्णाला नवीन जीवन मिळू शकते. हीच काळाची गरज ओळखून अमरावतीतील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी) 3 ते 13 ऑगस्ट दरम्यान विशेष अवयवदान जनजागृती अभियानाचा धडकेत शुभारंभ झाला. ‘ग्रीन लाईट’ मोहिमेअंतर्गत आयोजित या अभियानाचे औपचारिक उद्घाटन आमदार श्रीमती सुलभाताई खोडके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी समाजात याविषयी असलेली भीती आणि गैरसमज दूर करून ही चळवळ घराघरांत पोहोचवण्याचे कळकळीचे आवाहन केले. याप्रसंगी व्यासपीठावर अवयवदान जनजागृती राज्य समन्वयक श्रीमती सोनाली देशमुख, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे, विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे, मूत्रपिंड विकार तज्ज्ञ डॉ. हितेश गुल्हाने, डॉ. सौरभ लांडे, डॉ. विक्रांत कुडमेथे, डॉ. उज्वला मोहोड, डॉ. माधव ढोपरे, डॉ. अंजु दामोदर, डॉ. माधुरी गाडेकर, डॉ. सोनाली चौधरी, डॉ. पायल रोकडे, डॉ. दिव्यांनी मुंदाने, कार्यालय अधीक्षक विजय गाडे, श्रीकांत इखे, हरिदास सावळे, अधिसेविका चंदा खोडके, आहारतज्ज्ञ कविता देशमुख आणि रश्मिता दिघडे यांची प्रमुख उपस्थिती होती.या दहा दिवसांच्या मोहिमेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग रुग्णालय, इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालय, नभोवाणी (रेडिओ), बाह्यरुग्ण विभाग, आरोग्य कर्मचारी मार्गदर्शन सत्र, भव्य प्रबोधन रॅली आणि राष्ट्रीय संकेतस्थळावर (छजढढज) नोंदणी असे अनेक वैविध्यपूर्ण उपक्रम राबवले जाणार आहेत. या सर्व कार्यक्रमांचे सूत्रसंचालन समाजसेवक अधीक्षक शीतल बोंडे व ऋषिकेश धस यांनी केले. या महायज्ञात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन अवयवदानाचा हा विचार अगदी खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवावा, अशी आग्रही विनंती प्रशासनाने केली आहे.




