अंजनगाव बारीतील नागरिकांची जिल्हाकचेरीवर धडक

बजरंगपुरातील रहिवाशांना तिथेच घरे मिळावीत

 जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा

अमरावती /3 ऑगस्ट– तालुक्यातील अंजणगाव बारी येथील बजरंगपुरात गेल्या 15 वर्षांपासून वास्तव्य करणार्‍या नागरिकांनी भारतीय महिला मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देत त्याच ठिकाणी हक्काचे कायमस्वरूपी घर मिळण्याची मागणी केली आहे. या संदर्भात रहिवाशांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देताना स्पष्ट केले की, इतक्या वर्षांपासून वास्तव्य करूनही त्यांना दुसरीकडे स्थलांतरित करण्याचा दबाव टाकला जात आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, बजरंगपुरात राहणारी कुटुंबे मागील जवळपास पंधरा वर्षांपासून एकाच ठिकाणी राहत आहेत. ग्रामपंचायत अंजनगाव बारीकडून त्यांना घरपट्टी देण्यात आली आहे. याशिवाय शासनाच्या विविध योजनांतर्गत पिण्याचे पाणी, वीज तसेच इतर मूलभूत सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रहिवाशांचे म्हणणे आहे की, बहुतांश कुटुंबांची नावे शासकीय आवास योजनांच्या पात्रता यादीमध्ये समाविष्ट आहेत. त्यांनी आपल्या कष्टाने व जीवनभराच्या कमाईने याच ठिकाणी पक्की घरे बांधली आहेत. अशा परिस्थितीत त्यांना सध्याची जागा सोड इन दुसरीकडे बसवण्याचा प्रस्ताव त्यांच्यासाठी स्वीकार करणे शक्य नाही. निवेदनात आरोप करण्यात आला आहे की, ग्रामपंचायतीच्या काही अधिकार्‍यांकडून सध्याच्या भूमीवर आवास योजनेचा लाभ न देण्याबाबत बोलले जात असून दुसरीकडे घर देण्याचे सांगून सध्याची जागा खाली करण्यासाठी दबाव निर्माण केला जात आहे. रहिवाशांनी जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली आहे की, त्यांच्या दीर्घकाळापासूनचे वास्तव्य, उपलब्ध शासकीय सुविधा आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना त्याच ठिकाणी कायमस्वरूपी वसविण्यात यावे तसेच शासकीय आवास योजनेचा लाभ सुद्धा वर्तमान निवासस्थानीच देण्यात यावा. रहिवाशांचे म्हणणे आहे की, ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातून आहेत आणि दुसरीकडे जाऊन नवीन निवारा उभा करणे त्यांच्यासाठी शक्य नाही. म्हणूनच प्रशासनाने मानवीय दृष्टिकोन ठेवून त्यांच्या हितात निर्णय घ्यावा. निवेदन सादर करणार्‍यांमध्ये भारतीय महिला मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक खराते, उपाध्यक्ष संगीता वाघ, मुख्य मार्गदर्शन दिलीप गणोरकर, जिल्हाध्यक्ष संगीता इंगळे, शहराध्यक्ष संगीता तायडे, उपाध्यक्ष आशा सोळंके, जिल्हा उपाध्यक्ष सुनिता जगताप, चांदूर रेल्वे तहसील अध्यक्ष माया धोत्रे, शहराध्यक्ष शितल सदाफळे, जिल्हा उपनिरीक्षक सोनाजी टेकाडे, नांदगाव खंडेश्वर तहसील अध्यक्ष सुजाता इंगळे, शहराध्यक्ष किरण सिरसाट, शंकर यमगर, श्याम वाघमारे, घनश्याम सैरिसेे, दशरथ लोखंडे, रामचंद्र भोंगळे, गजानन बगले, आकाश सोनोने, प्रिया वाघमारे, कविता सैगोरे, ज्योत्स्ना लोखंडे, कल्पना भोंगळे, शितल हटवार, निलेश हटवार, निलेश मेहेत्रे, मनीषा मेहेत्रे, अर्जना बगडो, रोशनी वरडे, सुलताना बी एजाज अली, साइमा कौसर सिजोळ काजी, भारती सोनोने, उषा चौके यांच्यासह इतरही अनेक जण उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button