जमीन फेरफार घोटाळ्याची आता सखोल चौकशी

कलम 155 पुन्हा चर्चेत; भोगवटादार वर्ग बदलण्याच्या नावाखाली गैरप्रकार

सात उपविभागीय अधिकारी करणार क्रॉस चेकिंग

अमरावती जिल्ह्यातील महसूल विभागात मोठी खळबळ

अमरावती/ 8 एप्रिल– महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 155 चा आधार घेत जमीन भोगवटादार वर्ग बदलण्याच्या नावाखाली जिल्ह्यात मोठा गैरप्रकार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागील पाच वर्षांतील अशा सर्व प्रकरणांची फेरतपासणी करण्याचे आदेश दिले असून, यामुळे महसूल वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. जमिनीचे फेरफार करताना नियमांना बगल देऊन धनदांडग्यांचे हित जोपासल्याच्या तक्रारी शासन स्तरावर प्राप्त झाल्या होत्या. याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जिल्ह्यातील सातही उपविभागीय अधिकार्‍यांना 1 जानेवारी 2021 पासूनच्या सर्व प्रकरणांची कसून चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. या संपूर्ण प्रक्रियेसाठी 25 एप्रिलची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असून, चौकशीनंतरचा स्पष्ट अभिप्राय असलेला अहवाल स्वतः सादर करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. केवळ कलम 155 नुसार झालेले फेरफारच नव्हे, तर कलम 182, 220 आणि 257 अंतर्गत झालेल्या कारवायांचीही आता चिरफाड केली जाणार आहे. कलम 182 अन्वये दोषी व्यक्तींची मालमत्ता जप्त करून ती व्यवस्थापनाखाली आणणे, कलम 220 नुसार नाममात्र बोलीवर जमिनीची खरेदी करणे आणि कलम 257 नुसार महसूल व भूमापन अधिकार्‍यांच्या अखत्यारीतील अभिलेखांची चौकशी करणे, अशा व्यापक अधिकारांचा वापर करून हा तपास केला जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात या घोटाळ्याचे पडसाद उमटल्यानंतर राज्य सरकारने ही कठोर पावले उचलली आहेत. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता, भविष्यात उपजिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी आणि खुद्द जिल्हाधिकारी काही संशयास्पद प्रकरणांची अचानक तपासणी करण्याची शक्यताही शासन पत्रात नमूद करण्यात आली आहे. या मोहिमेला जिल्ह्यात मोठी गती मिळाली असून उपविभागीय अधिकार्‍यांकडे चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामध्ये अमरावती उपविभागीय अधिकारी भातकुली आणि तिवसा तालुक्याची चौकशी करतील, तर अचलपूर उपविभागीय अधिकारी अमरावती तालुक्याची तपासणी करतील. धारणी उपविभागीय अधिकार्‍यांकडे अचलपूर तालुक्याची, चांदूर रेल्वे उपविभागीय अधिकार्‍यांकडे दर्यापूर तालुक्याची, तर मोर्शी उपविभागीय अधिकार्‍यांकडे चांदूर रेल्वे तालुक्याची जबाबदारी असेल. तसेच भातकुली आणि तिवसा उपविभागीय अधिकारी मोर्शी तालुक्याची आणि दर्यापूर उपविभागीय अधिकारी धारणी तालुक्याची चौकशी करतील. अशा प्रकारे एकमेकांच्या कार्यक्षेत्रातील कामांची ’क्रॉस चेकिंग’ करून पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. जमिनीच्या व्यवहारात सामान्य शेतकर्‍यांची फसवणूक झाली असल्यास किंवा शासनाचा महसूल बुडवून फेरफार करण्यात आले असल्यास, संबंधितांवर कठोर कारवाईचे संकेत मिळत असल्याने सध्या महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.
अधिकारी आणि चौकशीचे कार्यक्षेत्र-महसूल मंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सातही उपविभागीय अधिकार्‍यांवर परस्परांच्या विभागातील चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अमरावती, भातकुली, तिवसा, अचलपूर, धारणी, चांदूर रेल्वे, मोर्शी आणि दर्यापूर या सर्व उपविभागांतील पाच वर्षांतील संशयास्पद जमिनींच्या प्रकरणांचा कच्चा चिट्ठा आता उघड होणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button