कोणार्कमुळे प्रशासनाची कोंडी : शहरवासी हैराण, काम ठप्प
कोणार्क कंपनीची यंत्रणा कोलमडली; कामगारांचा संप

शहराच्या स्वच्छतेचे वाजले बारा कचर्याचे प्रचंड ढीग
अमरावती/1एप्रिल: स्वच्छ भारत मिशनमध्ये कागदावर गौरवल्या जाणार्या अमरावती शहरात स्वच्छतेचा पार बोजवारा उडाला आहे. मुंबईच्या कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला शहरातील साफसफाईचा मक्ता दिल्यानंतर परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिकच खालावली आहे. आधीच लचर कामगार आणि साहित्याची वानवा असताना, आता सफाई कामगारांनी थकीत वेतन व आर्थिक सोयीसुविधांसाठी अचानक काम बंद आंदोलन पुकारल्याने ’दुबळेवर दोन आषाढ’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासनाने नवनिर्वाचित सभागृहाच्या पहिल्या आमभेची वाट न बघता घाईघाईने कोणार्क कंपनीला हा मक्ता दिला होता. 1 नोव्हेंबरला मिळालेल्या या मक्क्याचे काम 27 जानेवारीपासून सुरू झाले, पण एका महिन्यातच या कंपनीचे पितळ उघडे पडले. झोन क्रमांक 1 आणि 5 मधील प्रभाग 1 शेगाव-रहाटगाव, प्रभाग 2 संत गाडगेबाबा-पीडीएमसी, प्रभाग 3 नवसारी, प्रभाग 4 जमील कॉलनी, प्रभाग 5 जुना कॉटन मार्केट-महेंद्र कॉलनी, प्रभाग 6 विलास नगर-मोरबाग, प्रभाग 13 अंबापेठ-गौरक्षण, प्रभाग 14 जवाहर गेट-बुधवार बाजार आणि प्रभाग 17 गडगडेश्वर अशा 12 प्रभागांमध्ये आज ’गाडीवाला आया…’ ही साद ऐकूच आली नाही. कचरा उचलणारी यंत्रणाच नसल्याने शहरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. या गंभीर विषयावर महापौर श्रीचंद तेजवानी, मनपा आयुक्त सौम्या शर्मा आणि स्वच्छता अधिकारी डॉ. अजय जाधव यांनी मौन बाळगल्याने संताप व्यक्त होत आहे. सभागृह नेते चेतन गावंडे यांनी ठेकेदारावर दंडात्मक कारवाईचे निर्देश दिले असले तरी, परिस्थिती जैसे थे आहे. विरोधी पक्षनेते विलास इंगोले यांनी हा प्रश्न लवकर सुटण्याचा दावा केला आहे, मात्र भाजयुमोच्या सुरेखा लुंगारे यांनी हनुमान जन्मोत्सवाच्या तोंडावर जनभावनेची थट्टा होत असल्याचा आरोप केला आहे. प्रभाग 5 चे नगरसेवक धीरज हिवसे आणि प्रभाग 13 च्या स्वाती कुलकर्णी यांनी कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एमआयएमचे नगरसेवक सलाउद्दीन यांनी प्रशासनाच्या मेहेरबानीवर टोलेबाजी केली, तर स्वीकृत नगरसेवक संजय हिंगासपुरे यांनी महापालिकेच्या मनमानी कारभारावर टीका केली. प्रभाग 17 च्या प्रियंका पाटणे यांनी तर आयुक्तांना कचरा भेट देण्याचा इशारा दिला आहे.




