अमरावतीत सर्वसामान्यांच्या विविध मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन

शेतकरी कामगारांच्या हक्कांसाठी तीव्र लढा

महागाई आणि कामगार कायद्यांविरोधात निदर्शने

अमरावती /10 ऑगस्ट- जिल्ह्यात शेतकरी, कामगार, शेतमजूर, अंगणवाडी, आशा सेविका, शालेय पोषण आहार कर्मचारी, राष्ट्रीय स्वास्थ्य मिशनचे कर्मचारी, बेरोजगार तरुण, विद्यार्थी आणि महिला यांच्या विविध मागण्यांसाठी युनायटेड वर्कर्स युनियन कृती समिती तसेच युनायटेड किसान मोर्चाच्या वतीने सोमवारी देशव्यापी आवाहनानुसार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन करण्यात आले. दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवर झालेल्या संयुक्त राष्ट्रीय परिषदेच्या निर्णयानंतर अमरावतीत हे आंदोलन छेडण्यात आले. केंद्र सरकारची कामगार आणि शेतकरी विरोधी धोरणे, वाढती महागाई, शिक्षण, रोजगार, आरोग्य, सामाजिक सुरक्षा आणि शेतीमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे जनतेमध्ये तीव्र संताप उसळला आहे. आंदोलनादरम्यान सर्व कामगारांना 8 तासांच्या कामासाठी 30 हजार रुपये किमान वेतन मिळावे, चार श्रम कायदे त्वरित रद्द करावेत आणि सर्व कंत्राटी कामगारांना व अप्रेन्टिस कर्मचार्‍यांना तात्काळ कायम करावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली. अंगणवाडी, आशा, शालेय पोषण आहार आणि आरोग्य कर्मचार्‍यांना शासकीय कर्मचारी घोषित करून पेचन्, भविष्य निर्वाह निधी व ईएसआयसी सुविधा देण्याची मागणी करण्यात आली. केंद्र व राज्याच्या सर्व रिक्त जागा तातडीने भराव्यात, बेरोजगार युवकांना रोजगार मिळेपर्यंत भत्ता द्यावा, शेतकर्‍यांच्या सर्व शेतीमालाला स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार उत्पादन खर्चावर आधारित अधिक नफ्यासह किमान हमीभाव द्यावा आणि अमेरिकेसोबतचा शेतकरी विरोधी व्यापार करार व व्हीआर ग्राम कायदा रद्द करावा अशी मागणी लावून धरली. याशिवाय गॅस, पेट्रोल आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाढते भाव कमी करणे, वीज क्षेत्राचे खाजगीकरण रोखणे, स्मार्ट व प्रीपेड मीटर योजना बंद करणे, जुनी पेचन् योजना पुन्हा लागू करणे, अन्न सुरक्षेतील जाचक अटी बदलणे, एनटीएच्या परीक्षा रद्द करणे आणि आदिवासी क्षेत्रातील मोबिलायझर पदाचे निर्णय मागे घेण्याची जोरदार मागणी करण्यात आली. मोठ्या उद्योगपतींवर अतिरिक्त कर लावणे, जीएसटीचे दर कमी करणे आणि मंदिरांच्या जमिनीवरील शेतकर्‍यांचे अधिकार सुरक्षित करण्याची मागणी करण्यात आली. प्रशासनाने या गंभीर प्रश्नांवर तातडीने योग्य निर्णय न घेतल्यास आगामी काळात लढा अधिक तीव्र केला जाईल असा इशारा देण्यात आला. आंदोलनात सुभाश पांढरे, अंकुश वाघ, ओमप्रकाश वाघमारे, रमेश सोनवले, चंदा वानखडे, रेखा वानखडे, रेहाना खान, निलू मोलाम, सुनीता भावतोडे, उज्ज्वला लाड, मीना कापसे, वहीदा कलाम, क्षमा परवीन, लता मावदवे, अरूणा मालवीय, मुकुंद काळे, संगीता चौधरी, सारिका घोरपडे, संगीता दाभने, महादेव गावंडे, श्याम शिंदे, देवदास राऊत, दिलीप शापमोहन, सुभाश खांडेकर, पद्या गजभिये, आशा वैद्य, किशोर शिंदे, अब्दुल मोहरीन, विशाल शिंदे, वंदना बुरांडे, ज्योती नालटे, वैशाली नेवारे, नलू बोरकर, ममता काळे, संगीता वानखडे, प्रीती पानगे, संगीता अवकाळ, फहरिन खान, वैशाली उखे, बोरकर ताई, किरण रंगारी, पूजा तायडे, वर्षा कापसे, मीना गढवी, सनोबर, आश्विनी लोखंडे, दुर्गा वासनिक, मिताली पाटील, श्वेता सावरकर, अर्चना जनबंधू, अनिता जगताप, करूळे ताई, रंजना उपरीकर यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

संबंधित बातम्या

Back to top button