एफडीएचे धडक सत्र सुरू; अमरावती व नागपूरमध्ये 16 लाखांच्या ब्रेडसह ‘एजी मिल्क टोस्ट’ जप्त

अमरावती /10 ऑगस्ट – अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात एफडीए ची कारवाई अधिक तीव्र झाली आहे. पॅकेज्ड फूड, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, औषध दुकाने आणि गुटखा विक्रेत्यांवर कडक नजर ठेवण्यात येत असून, अमरावती आणि नागपूरमध्ये केलेल्या धडक कारवायांमुळे अन्न व्यवसायात मोठी खळबळ उडाली आहे.
शोभा नगरमध्ये ‘एजी मिल्क टोस्ट’ वर कारवाई
अमरावतीमधील शोभा नगर येथील एका डेअरी विक्रेत्यावर एफडीए अधिकारी गजानन गोरे यांच्या नेतृत्वाखाली धाड टाकण्यात आली. कृत्रिम स्वीटोलर ‘एस्पाटम’ चा वापर केल्याचा स्पष्ट उल्लेख किंवा ग्राहकांसाठी आवश्यक इशारा पॅकेटवर छापलेला नसल्यामुळे ‘एजी मिल्क टोस्ट’ चे 32 पॅकेट्स जप्त करण्यात आले.
एफडीएच्या मते, एस्पाटमयुक्त खाद्यपदार्थ लहान मुले आणि गर्भवती महिलांसाठी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक ठरू शकतात. पॅकेजिंगवर या घटकांची माहिती न दिल्यामुळे संबंधित उत्पादन, विक्री आणि वितरण तात्काळ रोकण्यात आले आहे. तसेच, सामान्य बेकरी उत्पादनाला विशिष्ट पोषण मूल्यांशिवाय ‘एजी’ असे नाव देऊन ग्राहकांची दिशाभूल केल्याबद्दलहीने आक्षेप घेतला आहे.
नागपूरमध्ये 16 लाखांचा मुद्देमाल जप्त-अमरावतीच्या कारवाईची माहिती मिळताच नागपूर येथील एफडीए अधिकार्‍यांनी तातडीने पावले उचलली. अन्न सुरक्षा अधिकारी संदीप एकनाथ सूर्यवंशी यांच्या पथकाने बुटीबोरी एमआयडीसीमधील एका कारखान्यावर धाड टाकून, ब्रेडच्या पॅकिंग लेबेलवर एस्पाटमचा उल्लेख नसलेला 16 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

हॉटेल्स आणि व्यावसायिकांमध्ये खळबळ
अमरावतीच्या पंचवटी चौकातील प्रसिद्ध ‘रोशनी हॉटेल’ सह अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स एफडीएच्या रडारवर आली आहेत. या धडक कारवाईमुळे अमरावती परिसरातील हॉटेल व्यावसायिक, पान मसाला विक्रेते आणि औषध विक्रेत्यांमध्ये मोठी दहशत पसरली असून, अनेकांनी स्वतःहून आपली दुकाने बंद ठेवणे पसंत केले आहे. विनाचिठ्ठी औषधे देणारे मेडिकल संचालकही आता सावध झाले आहेत.

पालक आणि गृहिणी वर्गातून समाधान
एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कठोर निर्देशानंतर शाळा व महाविद्यालयांच्या परिसराजवळ जंक फूड आणि गुटखा-तंबाखूच्या विक्रीवर प्रभावी प्रतिबंध लागला आहे. यामुळे आपल्या मुले जंक फूड आणि वाईट सवयींपासून दूर राहतील, या विचाराने अमरावतीसह राज्यातील पालक आणि गृहिणी वर्गात आनंदाचे व समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button