भातकुलीत ‘आरएमसी प्लांट’ प्रकरणात नियमांची सर्रास पायमल्ली
दोन वर्षांचा करार अन् सहा महिन्यांची अनुमती

नियम धाब्यावर बसवून भ्रष्ट कारभाराचा उच्छाद
भातकुली /10 एप्रिल– स्थानिक नगरपंचायत क्षेत्राच्या हद्दीत सुरू असलेल्या ’आरएमसी प्लांट’ प्रकरणात नियमांची सर्रास पायमल्ली करून मोठा गैरप्रकार झाल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी आणि कर्मचार्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड या कंपनीने रस्ते सुधारणा कामासाठी हा प्लांट उभारला असून, त्यास नगरपंचायतीने 22 मे 2025 रोजी तात्पुरते ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. मात्र, त्यानंतर झालेल्या सर्वसाधारण सभेत या परवानगीच्या कायदेशीर आधारावर लोकप्रतिनिधींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुख्याधिकार्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ना हरकतीसह केवळ सहा महिन्यांच्या कालावधीसाठी ही परवानगी दिल्याचे सांगितले असले, तरी प्रत्यक्षात कंपनीसोबत दोन वर्षांचा करार असल्याने यामागे मोठे अर्थकारण दडल्याचा दाट संशय व्यक्त होत आहे.
जागेचा आराखडा सादर केला असला तरी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, तरीही हा प्लांट कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस रितेश उर्फ निलेश माकोडे यांनी या संदर्भात जिल्हाधिकार्यांकडे निवेदन देऊन भ्रष्ट कारभाराची पोलखोल केली आहे. या अवैध प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रशासनाने डोळेझाक न करता दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
जागेचा लिलाव नाही अन् परवानगीचा पत्ता नाही
कोणताही कायदेशीर सोपस्कार पूर्ण झालेला नाही. नगरपंचायतीच्या सभेत संभ्रम निर्माण करून भ्रष्टाचाराचा हा रस्ता मोकळा करण्यात आल्याचा आरोप रितेश उर्फ निलेश माकोडे यांनी केला असून, जिल्हाधिकार्यांनी या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश द्यावेत.




