मनसे अन् उबाठाचे शेकडो शिलेदार राणांच्या पक्षात

बबलू आठवले अन् पवन दळवींचा युवा स्वाभिमानमध्ये प्रवेश

आ. रवी राणांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मोठा निर्धार

अमरावती /5 एप्रिल: जिल्ह्यात राजकीय घडामोडींनी वेग धरला असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत मोठा राजकीय भूकंप झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उबाठा गटाला मोठा धक्का देत, दोन्ही पक्षांतील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आ. रवी राणा यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत युवा स्वाभिमान पक्षात जाहीर प्रवेश केला. शंकर नगर येथील मुख्य कार्यालयात पार पडलेल्या या सोहळ्यात मनसेचे शहर संघटक बबलू आठवले आणि उबाठाचे युवा सेना उपजिल्हाप्रमुख पवन दळवी यांनी आपल्या समर्थकांसह हाती ’युवा स्वाभिमान’चा झेंडा घेतला. आमदार रवी राणा यांनी सर्व नवीन सदस्यांचे स्वागत करून त्यांच्या गळ्यात पक्षाचे उपरणे टाकले आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.
आमदार रवी राणा यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले की, युवा स्वाभिमान पार्टी ही केवळ एक राजकीय संघटना नसून, सामान्य जनतेच्या न्याय्य हक्कासाठी अहोरात्र लढणारे ते एक कुटुंब आहे. शहरातील कानाकोपर्‍यातून मोठ्या संख्येने तरुण आणि अनुभवी कार्यकर्ते पक्षात सामील होत आहेत, ही बाब जनसामान्यांचा आमच्या कामावरील वाढता विश्वास अधोरेखित करते. सामान्यांचे प्रश्न सोडवणे आणि शहराचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे एकमेव ध्येय असून, या नवीन ताकदीमुळे संघटन अधिक मजबूत झाले आहे. येणार्‍या काळात आम्ही अधिक जोमाने लोकहिताची कामे करू, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पक्षात येणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्याचा यथोचित सन्मान राखला जाईल आणि त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात संधी दिली जाईल, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. प्रवेश घेतलेल्या नेत्यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, आमदार रवी राणा यांची कार्यपद्धती आणि सामान्यांच्या हितासाठी धावून जाण्याची त्यांची वृत्ती आम्हाला भावली आहे. केवळ पोकळ आश्वासने न देता प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करणार्‍या नेतृत्वासोबत राहण्याचा निर्णय आम्ही घेतला असून, आता शहराच्या प्रगतीसाठी खांद्याला खांदा लावून काम करू. या भव्य सोहळ्याला अभिषेक राठी, निखिल अर्मळ, आकाश बंड, धनराज रामलखानी, रुपेश कोठार, अक्षय शहाकार, गणेश कांचनपुरे, सूर्या आठवले, प्रवीण घोरपडे, दीपक क्षीरसागर, सुरज गवई, सागर कदम, मनोज गुप्ता, मंगेश इंगळे, भूषण गायकी, श्रीकांत काजे, आकाश गुल्हाने, नवल आजनकार, आकाश साठे, आनंद अडायके, कुणाल आठवले, आनंद गौर, प्रफुल्ल माहुरे, चेतन प्रधाने, अनिकेत खांडेकर, रितेश पवार, हर्ष पाटे, ओम लांडगे, आशिष लोंढे, सागर पवार, धीरज गुप्ता, आकाश मेंढकर, पवन लांडगे, रविराज वानखडे यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी सुनील राणा, अनुप अग्रवाल, पराग चिमोटे, अविनाश काळे, शुभम उंबरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

संबंधित बातम्या

Back to top button