देशभरात उष्णतेची लाट, अकोल्याचा पारा सर्वांधिक 46.9 अंशावर

अमरावती ‘टॉप-2’ वर, जनजीवन विस्कळीत, विदर्भात सूर्याचा प्रकोप, अंगाची लाहीलाही

पुढील दोन दिवस भीषण चटके बसणार

अमरावती/26 एप्रिल- संपूर्ण देशासह विदर्भात सध्या सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून कडाक्याच्या उन्हामुळे सर्वसामान्य नागरिक पुरते होरपळून निघाले आहेत. निसर्गाचा हा रौद्र अवतार इतका भयानक आहे की अकोला आणि अमरावती जिल्ह्यांनी उष्णतेचे आजवरचे सर्व जुने विक्रम मोडीत काढले आहेत. रविवारी अकोल्यात तापमानाचा पारा 46.9 अंशांवर गेल्याने हे शहर देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले असून त्यापाठोपाठ अमरावती शहरात 46.8 अंश तापमानाची नोंद झाली आहे. यामुळे अमरावती आता देशभरात तापमानाच्या बाबतीत दुसर्‍या क्रमांकावर पोहोचले असून विदर्भातील ही उष्णतेची लाट आता जीवघेणी ठरू लागली आहे. वाढत्या उष्णतेमुळे दुपारच्या वेळी शहरात संचारबंदी लागल्यासारखा शुकशुकाट पाहायला मिळत असून रणरणत्या उन्हामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार केवळ वर्‍हाडच नव्हे तर संपूर्ण विदर्भात अंगाची कातडी भाजून काढणारे ऊन पडत आहे. विदर्भातील इतर शहरांचा विचार केला असता वर्धा येथे 46.4 अंश आणि यवतमाळ येथे 46.0 अंश तापमानाची नोंद झाली आहे. उपराजधानी नागपूरमध्ये 45.4 अंश तर चंद्रपूर येथे 45.0 अंश तापमानामुळे नागरिक घामाघूम झाले आहेत. वाशिम आणि गडचिरोली जिल्ह्यात 44.6 अंश तर गोंदियामध्ये 44.4 अंश आणि भंडारा पारा सर्वांधिक 46.9 अंशावरयेथे 44.0 अंश तापमानाने पारा पंचेचाळीशीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. या भीषण चटक्यांमुळे ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे कोलमडले असून शेतात काम करणे किंवा घराबाहेर फिरणे आता अशक्य झाले आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे अनेक गावांत पाणीटंचाईचे चटके बसत असतानाच निसर्गाच्या या प्रकोपाने ग्रामीण भागातील तहानलेल्या जनतेची मोठी दैना केली आहे. प्रतिचक्रवाती स्थितीमुळे निर्माण झालेला हा उष्णतेचा विळखा इतका घट्ट आहे की कोकणापासून ते विदर्भापर्यंत प्रत्येक नागरिक घामाघूम झाला असून रात्रीच्या वेळीही उष्ण वारे वाहत असल्याने कोणालाही चैन पडत नाहीये. हवामान खात्याने येत्या दोन दिवसांत विदर्भाला अतिउष्णतेचा इशारा दिला असून हा उन्हाचा तडाखा आणखी काही काळ असाच कायम राहणार आहे. त्यानंतर तापमानात थोडी घट होईल असा अंदाज असला तरी सध्याची स्थिती पाहता वदर्भाचे जणू वाळवंट झाले आहे की काय असा प्रश्न पडत आहे. दुपारच्या वेळी विनाकारण घराबाहेर पडणे आता केवळ त्रासदायकच नव्हे तर आरोग्यासाठी अत्यंत घातक आणि जीवघेणे ठरू शकते असा स्पष्ट इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. ग्रामीण भागात गुराढोरांचे प्रचंड हाल होत असून पाण्याचे सर्व नैसर्गिक स्रोत आटल्याने जनावरेही पाण्यासाठी कासावीस झाली आहेत. एकीकडे उन्हाच्या झळा आणि दुसरीकडे पाण्याची वानवा यामुळे विदर्भातील जनता सध्या संकटाच्या चक्रव्यूहात अडकली असून या स्फोटक उन्हाने यंदाच्या दशकातील सर्व विक्रम पायदळी तुडवले आहेत. जिल्ह्यातील अनेक भागात उष्णतेमुळे नागरिक दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळत आहेत ज्यामुळे बाजारपेठांवरही मोठा परिणाम झाला आहे. वाढत्या उन्हामुळे शीतपेये आणि पाण्याचे महत्त्व वाढले असले तरी कडक उन्हात ही पेयेही गरम होत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत असली तरी निसर्गाचा हा आगडोंब थांबण्याचे नाव घेत नाहीये. आगामी काळ अधिक कठीण राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणे हाच एकमेव पर्याय आता उरला आहे. गावाकडच्या भाषेत सांगायचे तर ’सूर्यदेव आता आग ओकायला लागलाय’ अशी अवस्था सध्या वर्‍हाडात पाहायला मिळत आहे.

विदर्भातील तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

शहर –                     तापमान
अकोला –                    46.9
अमरावती –                 46.8
वर्धा –                         46.4
यवतमाळ –                 46.0
नागपूर –                     45.4
चंद्रपूर –                      45.0
वाशिम –                    44.6
गडचिरोली –               44.6
गोंदिया –                   44.4
भंडारा –                     44.0

वृक्षारोपण काळाची गरज

अंगाची लाहीलाही करणार्‍या या भीषण उन्हात स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. भरपूर पाण्याचे सेवन करून सुती कपड्यांचा वापर करावा. वाढते तापमान ही निसर्गाची धोक्याची घंटा असून वृक्षारोपण करणे ही काळाची गरज बनली आहे. निसर्गाचा समतोल राखल्यास भविष्यातील संकटे टाळता येतील.

संबंधित बातम्या

Back to top button