बडनेरा उड्डाणपुलाचे काम रखडले का?
हायकोर्टाची केंद्र व राज्य सरकारला नोटीस

सहा आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश
अमरावती / 19 मार्च – जिल्ह्यातील बडनेरा येथील जुन्या बायपास मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगवर सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम गेल्या 6 वर्षांपासून का रखडले आहे? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने उपस्थित केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत न्यायालयाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह केंद्र आणि राज्य सरकारला नोटीस बजावून 6 आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
2020 मध्ये या पुलाला मंजुरी मिळाली होती आणि 2021 मध्ये 36 कोटींच्या खर्चासह कामाला सुरुवात झाली. मात्र, 650 मीटर लांबीच्या या पुलाचे काम निधीअभावी अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या रखडलेल्या कामामुळे शहरातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली.
निधीचे संकट आणि नाराजी -या पुलाच्या कामाची जबाबदारी’महारेल’वर आहे. अत्यल्प निधी मिळत असल्याने गेल्या वर्षापासून काम अंतिम टप्प्यात अडकले आहे. भूसंपादनाचा अत्यल्प मोबदला मिळाल्याने भूधारकही नाराज आहेत. दोन खासदारांचा कार्यकाळ संपला तरी काम अपूर्ण असल्याने नागरिकांमध्ये मोठा असंतोष आहे.




