पाऊस लांबल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त

चाळीस हजार हेक्टरवर खरीप पेरणी रखडली

* संतरा बागा सुकू लागल्याने बळीराजावर संकट

अमरावती /22 जून- जूनचा तिसरा आठवडा संपला तरी अमरावती जिल्ह्यात मान्सून सक्रिय न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. अचलपूर, चांदूर बाजार, खल्लर भागात पुरेसा पाऊस न झाल्याने तब्बल 40 हजार हेक्टरवर तुरी, कापूस आणि सोयाबीनची पेरणी रखडली आहे.
मशागत करूनही जमिनीत ओल नसल्याने बहुतांश शेतकर्‍यांना पेरणी करता आलेली नाही. ज्यांनी आधीच पेरणी उरकली, त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अचलपूर तालुक्यातील चमको, बोमनापूर, धोतरखेडा, गौरखेडा, एकलासपूर आणि खाम्री भागात 20 ते 25 टक्के बागा सुकू लागल्याने कोट्यवधींच्या नुकसानीची भीती आहे. बँकेचे कर्ज काढून आणि दागिने गहाण ठेवून बियाणे खरेदी केलेल्या शेतकर्‍यांची चिंता कडक उन्हामुळे अधिक वाढली आहे. सावलापूर, कोल्हा, काकडा, शिंदी, असदपूर, चौताळा, असेगाव आणि इसापूर या कापूस-तूर उत्पादक पट्ट्यातही तिच अवस्था आहे. चांदूर बाजार तालुक्यात ढगाळ वातावरण असूनही पाऊस गायब आहे. 17 जून रोजी येथे वीज पडून तीन गुरांचा मृत्यू झाला होता. पेरणी रखडल्यामुळे शेतमजूर, ट्रॅक्टर चालक आणि बियाणे विक्रेते यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला असून ग्रामीण अर्थव्यवस्था मंदावली आहे. दर्यापूर आणि खल्लर भागातही शेतकरी हतबल झाले असून, खर्च वाया जाण्याच्या भीतीने गावोगावी केवळ पावसाचीच प्रतीक्षा केली जात आहे. हवामान खात्याच्या अंदाजावर आता शेतकर्‍यांची भिस्त आहे.

संबंधित बातम्या

Back to top button