आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त अमरावतीत सामूहिक योगाभ्यास

विविध संस्थांच्या सहभागातून कार्यक्रम उत्साहात

अमरावती/22 जून: आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त अमरावती महानगरपालिका आणि श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. 21 जून 2026 रोजी सकाळी 7.00 वाजता नेताजी सुभाषचंद्र बोस इनडोअर स्टेडियम येथे भव्य सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे आणि नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाला विधी समिती उपसभापती डॉ. मधुरा मिलिंद काहाळे, अमरावती महानगरपालिकेच्या पूर्व झोन क्र. 3, दस्तुर नगर कार्यालयाचे सहायक आयुक्त नितीन बोबडे, सहायक क्षेत्रीय अधिकारी शेखर सोनकांबळे, अभियंता मिलिंद काहाळे तसेच सुधीर रोहनकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी योगाचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांना नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय, पतंजली योग समिती, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी तसेच महाबँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था यांचा सक्रिय सहभाग लाभला. विविध संस्थांमधील प्रशिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी आणि योगसाधकांनी सामूहिकरीत्या योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा आणि सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक सादर केले. या प्रात्यक्षिकांना उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या प्रारंभी योगदिनाचे महत्व विषद करण्यात आले. योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारी जीवनशैली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बदलत्या जीवनशैलीमुळे वाढत असलेले ताणतणाव, मानसिक अस्वस्थता आणि विविध आजारांपासून बचाव करण्यासाठी योग अत्यंत प्रभावी माध्यम असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्थैर्य, एकाग्रता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होण्यास मदत होते, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. नेताजी सुभाषचंद्र बोस इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित या कार्यक्रमात विविध शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था, योगप्रेमी नागरिक, विद्यार्थी, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. सर्व सहभागींच्या एकत्रित योगाभ्यासामुळे संपूर्ण परिसरात आरोग्य, शिस्त आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले होते. उपस्थितांनी योगाच्या विविध क्रियांचा अनुभव घेत निरोगी जीवनाचा संकल्प केला. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून योग हा भारतीय संस्कृतीचा अमूल्य वारसा असून त्याचा प्रसार जागतिक स्तरावर होत असल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. आज जगभरातील कोट्यवधी लोक योगाचा स्वीकार करत असून भारताने जगाला दिलेली ही अनमोल देणगी असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करून निरोगी आणि आनंदी जीवन जगावे, असे आवाहनही करण्यात आले. अमरावती महानगरपालिका आणि श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे तसेच विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांच्या सहकार्यामुळे आंतरराष्ट्रीय योगदिनाचा हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व सहभागी संस्था, प्रशिक्षक, स्वयंसेवक आणि नागरिकांचे आभार मानण्यात आले. आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आयोजित या सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमाने ‘योगा फॉर वन अर्थ, वन हेल्थ’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीतून अधोरेखित करत आरोग्यदायी आणि सकारात्मक जीवनशैलीचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचविला.

संबंधित बातम्या

Back to top button