मेळघाटात माणुसकी अन् पक्ष्यांचे अनोखे नाते
पायविहीरची लांडोर बनली गावची लेक

* जंगल सोडून पक्ष्यांचा मानवी वस्तीत राबता
मेळघाट/9 मार्च– निसर्गाच्या कुशीत वसलेल्या मेळघाटातील पायविहीर गावाने प्राणी आणि मानवामधील प्रेमाचा एक नवा आदर्श जगासमोर ठेवला आहे. एरवी माणसाची चाहूल लागताच उडून जाणारी लांडोर आज या गावात घरातील सदस्याप्रमाणे वावरत आहे. केवळ जंगल भागात न राहता हा रानटी पक्षी गेल्या चार वर्षांपासून गावातील गल्लीबोळ, अंगण, शाळा आणि शेतांमध्ये मुक्तपणे संचार करत असून त्याने संपूर्ण गावाला आपल्या मायेच्या पाशात गुंफले आहे. या अनोख्या मैत्रीमुळे पायविहीर गावाची ओळख आता ’लांडोरचे गाव’ म्हणून सर्वदूर पसरली आहे.
या विलक्षण कहाणीची सुरुवात एका अंड्यापासून झाली. साधारण चार ते पाच वर्षांपूर्वी गावातील सीताराम जांभू हे जंगल परिसरात लाकडे आणण्यासाठी गेले होते. तिथे त्यांना मोराचे एक अंडे सापडले. ते अंडे सुरक्षित राहावे या हेतूने त्यांनी ते गावात आणले आणि आपल्या घरातील कोंबडीसोबत ठेवले. निसर्गाचा चमत्कार असा की, त्या कोंबडीने त्या अंड्याचा सांभाळ केला आणि त्यातून एका लांडोरचा जन्म झाला. सुरुवातीला कोंबड्यांमध्ये वावरणारी ही लांडोर हळूहळू मोठी झाली आणि तिने संपूर्ण गावालाच आपले घर मानले, अशी माहिती ग्रामस्थ रामकिसन जांभू यांनी दिली. आज ही लांडोर केवळ एका घरापुरती मर्यादित नसून ती संपूर्ण गावची सदस्य झाली आहे. ती कोणाच्याही छपरावर बसते, कोणाच्याही अंगणात दाणे टिपते आणि शेतात अगदी मालकासारखी डौलाने वावरते. ग्रामस्थ तिला मनापासून गहू, तांदूळ आणि पाणी देतात. गावातील लहान मुलांसाठी तर ही लांडोर जणू जिवंत खेळणेच बनली आहे. अनिकेत तांडील हा चिमुकला सांगतो की, आम्ही या लांडोरसोबत खेळतो आणि तिच्याशी आमचे आपुलकीचे नाते जडले आहे. पावसाळ्यातील तिचा वावर संपूर्ण गावाचा आनंद वाढवतो. पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनलेल्या या लांडोरला पाहण्यासाठी दूरवरून लोक पायविहीरला येतात. पर्यटक तिची छायाचित्रे आणि चित्रफिती काढण्यात दंग असतात. अनेकदा ही लांडोर शेजारच्या गावांमध्येही फेरफटका मारून पुन्हा आपल्या गावात परत येते. शेजारच्या गावातील प्रत्येकाला ही लांडोर पायविहीरचीच आहे हे ठाऊक असल्याने तिला तिथेही त्रास दिला जात नाही, असे रामकिसन जांभू आवर्जून सांगतात.वनविभागाच्या नियमांनुसार रानटी पक्ष्याला घरात ठेवणे गुन्हा असला तरी या प्रकरणात वनविभागाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. ही लांडोर कोणाच्याही मालकीची किंवा कैदेत नसून ती स्वतःच्या इच्छेने गावात मुक्तपणे वावरत आहे. गावकर्यांकडून तिची योग्य काळजी आणि संरक्षण मिळत असल्याने कोणतीही कारवाई करण्याची आवश्यकता नाही, असे एका वन अधिकार्याने स्पष्ट केले आहे.
पायविहीरच्या लांडोरची अनोखी महती
सीताराम जांभू यांनी वाचवलेल्या अंड्यातून जन्मलेली लांडोर आज पायविहीर गावाची शान वाढवत आहे. लहान मुलांची जिवलग सोबती आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या या पक्ष्याला संपूर्ण गाव आपले मानून संरक्षण देते. जंगल सोडून मानवी वस्तीत राहणार्या या लांडोरची गोष्ट माणुसकीचा एक जिवंत ठेवा ठरली आहे.




