विद्यापीठ सुध्दा कर्मचार्‍यांच्या ऋणात राहील

कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांचे प्रतिपादन

अमरावती /27 मार्च : अमरावती : निष्ठा हा कर्मचार्‍यांना विद्यापीठाशी जोडणारा एक भक्कम धागा असून, प्रत्येक कर्मचार्‍याने आपल्या आयुष्याची प्रदीर्घ वर्षे या संस्थेसाठी वाहिली आहेत. समर्पण, त्याग आणि प्रामाणिकपणाच्या बळावर कर्मचार्‍यांनी दिलेली ही अखंड सेवा विसरता येणार नाही. या निष्ठेबद्दल विद्यापीठ प्रशासन त्यांचे नेहमीच ऋणी राहील, असे मनाला भिडणारे उद्गार कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी काढले.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील कर्मचार्‍यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित ’कर्तव्यपूर्ती’ सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. व्ही. एम. नागरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, प्रभारी वित्त व लेखा अधिकारी मंगेश वरखेडे, कार्यकारी अभियंता शशिकांत रोडे, उपकुलसचिव डॉ. सुलभा पाटील, कर्मचारी संघाचे अध्यक्ष अजय देशमुख आणि जनसंपर्क अधिकारी विलास नांदुरकर उपस्थित होते. डॉ. बारहाते पुढे म्हणाले की, कर्मचार्‍यांच्या अशाच चिकाटीमुळे त्यांच्या कुटुंबाची आणि पाल्यांची प्रगती झाली आहे. याप्रसंगी अनिल काळबांडे, अनिल काळे, माधव वारके, मुरलीधर चिलुरकर आणि किशोर गजघुमे यांचा शाल, श्रीफळ व गौरव प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या पत्नींचाही साडी-चोळी व सौभाग्यलेणे देऊन सन्मान करण्यात आला. डॉ. व्ही. एम. नागरे यांनीही कर्मचार्‍यांच्या निष्ठेचे कौतुक केले. डॉ. नितीन कोळी, मंगेश वरखेडे, शशिकांत रोडे, डॉ. सुलभा पाटील आणि अजय देशमुख यांनी सत्कारमूर्तींच्या कामाची प्रशंसा केली. सत्कारमूर्तींनी आपल्या मनोगतातून विद्यापीठातील स्नेहभावाबद्दल आभार मानले. विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने भागभांडवलाचे धनादेश व पुस्तके देऊन सर्वांचा सत्कार करण्यात आला. कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. विलास नांदुरकर यांनी सूत्रसंचालन आणि डॉ. धनंजय पाटील यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या

Back to top button