पर्यावरणपूरक प्रवेशोत्सव ‘मणीबाईच्या दारी, शिक्षणाची वारी’

नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

अमरावती /30 जून: दी गुजराती एज्युकेशन सोसायटी, अमरावती द्वारा संचालित मणीबाई गुजराती हायस्कूल, अंबापेठ अमरावती येथे ‘मणीबाईच्या दारी, शिक्षणाची वारी’ या आकर्षक संकल्पने अंतर्गत पर्यावरणपूरक प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. याप्रसंगी दिंडीच्या पर्यावरणपूरक सजावटीने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन करून शिक्षणाच्या वारी मधून ज्ञानपूजनाचा संदेश देण्यात आला. नवागत विद्यार्थ्यांचे टाळ्यांच्या गजरात व पुष्पवर्षावाने स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पाठ्यपुस्तकांचे वितरण करून नवीन शैक्षणिक वर्षाची आनंददायी सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमात उपस्थित स्वागताध्यक्ष सी.ए. डॉ. निलेशभाई लाठीया, विशेष उपस्थित नितीनभाई सेठ, सुरेशभाई राजा, तुषारभाई श्रॉफ, भरतभाई भायानी, योगेंद्रभाई देसाई, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. श्री श्याम नीळकरी या सर्व मान्यवरांचे मुख्याध्यापिका सौ. अंजली देव यांनी रोपटे भेट देऊन पर्यावरणपूरक पद्धतीने स्वागत केले. स्वागताध्यक्ष सी.ए. डॉ. श्री. निलेशभाई लाठीया यांनी विद्यार्थ्यांसोबत शिक्षणाच्या वारीमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला व नवीन सत्रासाठी दी गुजराती एज्युकेशन सोसायटी, अमरावती तर्फे विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्याध्यापिका अंजली देव यांनी विद्यार्थी, पालक व उपस्थितांना संबोधित करत ’एक पेड माँ के नाम’ या पर्यावरण संवर्धन उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आईच्या नावाने किमान एक रोपटे लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच नवागत विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत शिक्षणाबरोबरच संस्कार, पर्यावरण संरक्षण व सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. प्रवेशोत्सवामध्ये उपमुख्याध्यापक अनिल पंजाबी, पर्यवेक्षक सौ. सरिता गायकवाड, अरविंद हिरपरा तसेच शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी संत व वारकरी यांची वेशभूषा परिधान करून आलेल्या नवागत विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. पर्यावरण संरक्षणाचा संदेश, ज्ञानाची उपासना आणि विद्यार्थ्यांच्या आनंदी स्वागताचा सुंदर संगम घडविणारा हा पर्यावरणपूरक प्रवेशोत्सव ‘मणीबाईच्या दारी, शिक्षणाची वारी’ उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील, अशी भावना यावेळी पालकांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या

Back to top button