भीषण उन्हामुळे वीज देयकाचा शॉक
अतिरिक्त सुरक्षा निधीची सक्ती वाढली

* सामान्य वीज ग्राहकांच्या खिशाला कात्री
अमरावती/10 मे– राज्यामध्ये उन्हाचा पारा चांगलाच चढल्याने विजेच्या वापरात प्रचंड वाढ झाली असून घरगुती उपकरणांच्या वापरामुळे वीज देयके दुप्पट झाली आहेत. यातच आता महावितरणने ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा निधी जमा करण्याच्या नोटिसा धाडल्याने सामान्य जनता संताप व्यक्त करत आहे.
राज्यात सध्या सूर्य आग ओकत असून अंगाची लाहीलाही होत आहे. या कडाक्याच्या उन्हापासून बचाव करण्यासाठी घराघरांत पंखे, कुलर, वातानुकूलित यंत्रे आणि शीतकपाटांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. विजेचा वापर वाढल्याने साहजिकच मासिक वीज देयकाची रक्कम वाढून आली आहे. मात्र, महावितरणने आता ’अतिरिक्त सुरक्षा निधी’ या नावाखाली 50 रुपयांपासून ते 5 हजार रुपयांपर्यंतची वसुली सुरू केली आहे. महावितरणच्या या निर्णयामुळे सामान्य ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त बोजा पडत असून भर उन्हात ग्राहकांना आर्थिक शॉक बसत आहे.दरवर्षी एप्रिल महिन्यात महावितरणकडून ग्राहकांच्या मागील वर्षातील वीज वापराचा आढावा घेतला जातो. ज्या ग्राहकांचा वीज वापर जास्त असतो, त्यांच्याकडून सुरक्षा निधी म्हणून अतिरिक्त रक्कम मागितली जाते. भविष्यात ग्राहकाने वीज बिल थकवले तर होणारे आर्थिक नुकसान टाळणे हा यामागचा मुख्य हेतू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. अनेक घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांना 2 हजार ते 5 हजार रुपयांपर्यंतच्या नोटिसा मिळाल्या आहेत. वाढत्या मागणीमुळे विजेचे उत्पादन आणि पुरवठा यांचे गणित आधीच बिघडले असताना, या नवीन आर्थिक संकटामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.




