बिजुधावडी मार्गावरील अपघातात आठ गंभीर

मेळघाटात पुन्हा एकदा अपघाताचा थरार

* नऊ वर्षांच्या चिमुकल्यासह तिघांची प्रकृती खालावली
* दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक

अमरावती / 27 फेब्रुवारी : मेळघाटातील रस्ते जणू रक्ताने माखण्यासाठीच शापित ठरत आहेत. धारणी तालुक्यातील शिवाझरी घाटातील त्या काळजाचा थरकाप उडवणार्‍या भीषण अपघाताची जखम अजून ताजी असतानाच, शुक्रवारी रात्री बिजुधावडी मार्गावर मृत्यूने पुन्हा एकदा आपला क्रूर खेळ मांडला.
दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर झालेली ही धडक इतकी विदारक होती की, रस्त्यावर रक्ताचा सडा पडला असून आठ जण मृत्यूच्या दाढेत ओढले गेले आहेत. या भीषण अपघातात नऊ वर्षांच्या चिमुकल्यासह तिघांची प्रकृती अत्यंत नाजूक असून, त्यांना मृत्यूशी झुंज देण्यासाठी तातडीने अमरावतीला हलवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास बिजुधावडी मार्गावर काळ दबा धरून बसला होता. सावरिया, ढाकणा, बैराटिकी आणि गडगा भांडुम येथील रहिवासी असलेल्या प्रवाशांच्या दुचाकींची समोरासमोर अशी काही जोरदार धडक झाली की, क्षणात होत्याचे नव्हते झाले. धडकेचा आवाज एवढा मोठा होता की परिसरातील नागरिक धावत सुटले, मात्र समोरचे दृश्य पाहून त्यांच्याही काळजाचा ठोका चुकला. रस्त्यावर विखुरलेले दुचाकींचे अवशेष आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमींच्या किंकाळ्यांनी रात्रीचा शांत परिसर हादरून गेला होता. या अपघातात सेजु मुन्ना दहिकर (35), नऊ वर्षांचा सनम सेजु दहिकर आणि शिवनारायण झाबरकर (22) हे तिघेही गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे ’रेफर’ करण्यात आले आहे. तसेच जयसिंग रामलाल जांभेकर (18), किरण हुबलाल धांडे (17), सोहम लालचंद कास्देकर (14), गणेश परसराम जांभेकर (17) आणि पंकज प्रेमलाल काळे (25) हे तरुणही या भीषण अपघाताचे बळी ठरले असून त्यांच्यावर धारणीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच 108 रुग्णवाहिकेचे चालक तरुण आणि डॉक्टर मोईन यांनी युद्धपातळीवर मदतकार्य राबवून जखमींना रुग्णालयात पोहोचवले. धारणी पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून वेगाच्या नशेत निष्पापांचे जीव धोक्यात घालणार्‍या प्रवृत्तींविरुद्ध कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. मेळघाटातील रस्त्यांवर वारंवार घडणार्‍या या रक्तपातामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये आता संतापाची प्रचंड लाट उसळली आहे.

वेगाची ‘नशा’ अन् निष्पापांची ‘दशा’! 

मेळघाटातील रस्ते आता मृत्यूचे सापळे बनू लागले आहेत. शिवाझरी घाटात चालकाच्या हलगर्जीपणामुळे पाच जणांचा बळी गेला होता, तर आज बिजुधावडी मार्गावर वेगाच्या वेडापायी आठ जण रक्ताच्या थारोळ्यात पडले आहेत. दुचाकी चालवताना वेगावर ताबा नसणे आणि नियमांना धाब्यावर बसवणे यामुळेच ही रक्ताची होळी खेळली जात आहे. प्रशासनाने आता अशा बेदरकार चालकांवर कठोर कारवाईची ’धडकी’ भरवावी, अशी मागणी संतप्त जनतेतून केली जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button