एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री पाहण्याची इच्छा- आ.बच्चू कडू

मुख्यमंत्री पदावरून महायुतीत नवा वाद

बदलाची अपेक्षा न पूर्ण झाल्यास आंदोलन

अमरावती /8 जून- मेळघाटाच्या विकासासाठी आणि शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी आ. बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत सरकारला थेट इशारा दिला आहे. महायुतीमधील सत्तासंघर्षावर भाष्य करताना त्यांनी एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री पाहण्याची इच्छा व्यक्त केली, तर देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय राजकारणात जावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मेळघाटातील प्रलंबित विकासकामे आणि शेतकर्‍यांच्या कर्जमाफीतील त्रुटींमुळे संतप्त झालेल्या आ. कडू यांनी दीपावलीपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. यासह शेतकर्‍यांना मिळणारे 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान एक लाखापर्यंत वाढवण्याची आग्रही मागणीही त्यांनी केली आहे.
मेळघाट आणि आसपासच्या दुर्गम भागातील जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी आ. बच्चू कडू यांनी धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील गावांचा दौरा केला. यावेळी ग्रामस्थांनी पिण्याचे पाणी, अपुरा वीजपुरवठा आणि रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधांच्या अभावाचा पाढा वाचला. केवळ बैठका आणि आश्वासनांनी आता भागणार नाही, तर प्रत्यक्ष जमिनीवर काम दिसले पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी प्रशासनाला फटकारले. सरकारी अधिकारी केवळ अहवाल तयार करण्याचे काम करतात, मात्र त्याचा कोणताही लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाही, असेही त्यांनी नमूद केले. वनहक्क आणि रोजगाराच्या प्रश्नांवर त्यांनी संताप व्यक्त केला. कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना, सरकारने जाहीर केलेली दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी पुरेशी असली तरी त्यातील जाचक अटींमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित आहेत, असे आ. कडू यांनी स्पष्ट केले. नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहन म्हणून दिले जाणारे 50 हजार रुपयांचे अनुदान आता एक लाख रुपये करण्याची मागणी त्यांनी रेटली आहे. दिव्यांग शेतकर्‍यांचे संपूर्ण कर्ज माफ व्हावे, अशी आग्रही मागणीही त्यांनी लावून धरली. महायुतीमधील अंतर्गत राजकारणावर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक शिवसैनिकाची इच्छा आहे की एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत. तसेच, शिवसेनेला बाजूला सारण्याचा प्रयत्न करणार्‍यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचे समर्थन केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणार कडू-मेळघाटातील रखडलेल्या विकासकामांची पूर्तता आणि शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी आ. बच्चू कडू यांनी प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे. दीपावलीपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास हजारो गावकरी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. आपल्या हक्कांसाठी आणि दिव्यांगांच्या समस्या सुटत नाहीत तोपर्यंत लढा सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी केला आहे.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button