टँकरच्या धडकेत 2 दुचाकीस्वारांचा मृत्यू
कपाळावरचा मळवट अन देवीचा नवस ठरला शेवटचा

चिखलदरा पोलिसांना मृतदेहांची ओळख मिळेना
चिखलदरा/27एप्रिल– मेळघाटातील चिखलदरा ते घाटांग मार्गावर सोमवारी सायंकाळी मृत्यूने असा काही झडप घातली की पाहणार्यांच्या काळजाचा ठोका चुकला. अमझिरी गावाजवळ एका भरधाव पाणी टँकरने दुचाकीला इतकी भीषण धडक दिली की, दोन दुचाकीस्वारांचा जागीच करुण अंत झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले ते देह आणि चक्काचूर झालेली दुचाकी पाहून हा अपघात किती भयानक होता, याची प्रचिती येत होती. चिखलदरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतले असून, अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, चिखलदरा तालुक्यातील घाटंग मार्गावरील अमझिरी शिवारात सोमवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास हा थरार घडला. एमएच 04 सीयू 1712 क्रमांकाचा पाण्याचा टँकर चिखलदर्याच्या दिशेने वेगात येत होता. याच वेळी चिखलदरा येथील देवीचे दर्शन घेऊन आणि नवस फेडून दोन तरुण आपल्या काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीने परतत होते. अमझिरी गावाजवळील एका धोकादायक वळणावर टँकर चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा पांढरा हत्ती थेट दुचाकीवर चढला. ही धडक इतकी जोरात होती की दुचाकीस्वारांच्या डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. घटनेनंतर टँकर चालक जागीच टँकर सोडून फरार झाला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अपघातातील मृतांपैकी एकाने पांढर्या-काळ्या चौकडीचा शर्ट घातलेला आहे, तर दुसर्याने निळ्या रंगाचा शर्ट आणि राखाडी रंगाची पँट घातलेली आहे. या तरुणांकडे कोणतेही ओळखपत्र न सापडल्याने चिखलदरा पोलिसांनी आता त्यांच्या कपड्यांवरून आणि दुचाकीच्या क्रमांकावरून नातेवाईकांचा शोध सुरू केला आहे. या अपघाताने वळणदार घाटरस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून ’वेगावर नियंत्रण’ नसल्याने दोन निष्पाप जीवांचा बळी गेला आहे.‘मृत्यूचा सापळा बनलेलं ते वळण-अमझिरी जवळील हे वळण आता मृत्यूचा सापळा बनत चाललं आहे. भरधाव येणारे टँकर आणि वळणावर नसलेला वेग मर्यादा फलक यामुळे येथे वारंवार अपघात होत आहेत. देवीचा नवस फेडून आनंदाने घरी जाणार्या त्या तरुणांना काळाने याच वळणावर गाठले. हे तरुण कोणाचे आहेत, कोठून आले होते, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.




