पोलीस आयुक्तालयातील तक्रार निवारणाचा ‘वार’ बदलला!
आता दर मंगळवारी होणार गार्हाण्यांचा निकाल, पोलीस आयुक्त राकेश ओला यांचा थेट पुढाकार

अमरावती /20 मार्च : शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर पकड मिळवत सर्वसामान्य जनतेच्या समस्यांचे जागेवरच निराकरण व्हावे, यासाठी पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी पुढाकार घेतला आहे. यापूर्वी दर शनिवारी होणारा ’तक्रार निवारण दिन’ आता प्रशासकीय सोयीसाठी बदलण्यात आला असून, तो प्रत्येक मंगळवारी दुपारी 3 ते 5 या वेळेत पोलीस आयुक्तालयात संपन्न होईल, असे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.
अमरावती शहर पोलीस दलाची धुरा हाती घेतल्यापासून राकेश ओला यांनी पोलीस आणि जनता यांच्यातील दरी कमी करण्यावर भर दिला आहे. खाकी वर्दीबद्दल लोकांच्या मनात विश्वास निर्माण व्हावा आणि सर्वसामान्यांचे प्रश्न विनाकारण प्रलंबित राहू नयेत, यासाठी 7 फेब्रुवारी 2026 पासून तक्रार निवारण दिनाची संकल्पना राबवण्यात येत होती. या विशेष उपक्रमाला शहरातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याने, कामाचा वेग वाढवण्यासाठी यात अंशतः बदल करण्यात आला आहे. आता शनिवारऐवजी प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी दुपारी ठीक 15.00 ते 17.00 या वेळेत पोलीस आयुक्तालय परिसरात नागरिक आपल्या तक्रारी आणि अडचणी थेट वरिष्ठ अधिकार्यांसमोर मांडू शकतील. अमरावती शहरातील प्रत्येक नागरिकाने या बदलाची नोंद घ्यावी आणि आपल्या न्याय हक्कासाठी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोलीस आयुक्तांकडून करण्यात आले आहे. शहरवासीयांच्या समस्यांना तातडीने वाचा फुटून त्यांना दिलासा मिळेल, अशी खात्री या निमित्ताने जनसंपर्क अधिकार्यांनी व्यक्त केली आहे.




