भाजप म्हणजे विषारी नाग आणि दंश करणारा साप

सत्तेचा माज चढलेल्यांना जनताच धडा शिकवेल

औषध खरेदीतील कमिशनखोरीवरून बच्चू कडूंचा जोरदार प्रहार

अमरावती / 12 फेब्रुवारी – प्रहार जनशक्ती पक्षाचे मुख्य नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी भारतीय जनता पक्षावर अतिशय तिखट शब्दांत हल्ला चढवला असून, भाजपची तुलना थेट ’विषारी सापाशी’ केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संशयावरून बोलताना कडू यांनी भाजपसोबतची मैत्री आणि शत्रूत्व दोन्ही धोक्याचे असल्याचे सांगत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली. औषध खरेदीतील भ्रष्टाचार आणि ’ना खाऊंगा ना खाने दूंगा’ या घोषणेच्या फोलपणावर बोट ठेवत, वेळ पडल्यास कानशिलात लगावण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, भाजपच्या खांद्यावर कोणी हात ठेवला किंवा त्यांनी कोणाच्या खांद्यावर हात ठेवला तरी तो माणूस संपलाच म्हणून समजा. भाजप हा कधीही दंश करणारा विषारी नाग आहे. राज्याच्या आरोग्य विभागात औषध खरेदीचे अधिकार जिल्हा स्तरावरून काढून मंत्रालयाकडे नेणे, हा केवळ कमिशन खाण्याचा प्रकार आहे. गरिबांच्या हक्काचा पैसा लुटला जात असून लाडकी बहीण योजना, रुग्ण आणि दिव्यांगांचे पैसे वेळेवर मिळत नाहीत. केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी निविदांचा खेळ सुरू असल्याचा आरोप करत कडू यांनी सत्तेचा माज उतरवण्याचा इशारा दिला आहे.
कमिशनखोरीचा नवा खेळ -ना खाऊंगा, ना खाने दूंगा म्हणणारेच आज सर्वात जास्त भ्रष्टाचार करत आहेत, असा घणाघात बच्चू कडू यांनी केला. औषध खरेदीचे विक्रेंद्रीकरण मोडून मंत्रालयातून निविदा काढणे हा केवळ टक्केवारीसाठी सुरू असलेला प्रकार आहे. सामान्यांच्या पैशांची ही लूट असून भ्रष्ट कारभाराला आता जनताच उत्तर देईल, असे कडू यांनी ठणकावून सांगितले.

संबंधित बातम्या

Back to top button