अमरावती विद्यापीठाला ‘एफडीए’चा दणका, कॅन्टीन सील
परवाना नसतानाही उपहारगृह सुरु

अमरावती/30 जुलै: संत गाडगे बाबा अमरावतीविद्यापीठ परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. विद्यापीठातील मुख्य कॅन्टीन (उपाहारगृह) कोणत्याही अधिकृत परवान्याशिवाय सुरू असल्याचे उघड झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाने 30 जुलै रोजी या कॅन्टीनवर अचानक धाड टाकून तपासणी केली आणि त्याच दिवशी कॅन्टीन सील करण्याची धडक कारवाई केली. या संदर्भात ‘एफडीए’ने विद्यापीठाच्या कुलसचिवांना थेट पत्र पाठवल्याने विद्यापीठ वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे अन्न व सुरक्षा अधिकारी गजानन गोरे यांनी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांना एक कडक पत्र जारी केले आहे. या कॅन्टीनमध्ये दररोज कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव, विविध प्राधिकारी सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शेकडो विद्यार्थी भोजन व अल्पोपहार करत असतात. मात्र, हे कॅन्टीन पूर्णपणे बेकायदेशीर आणि विनापरवाना चालवले जात असल्याने, आतापर्यंत या सर्वांच्या आरोग्याशी सरळ-सरळ खेळ सुरू असल्याचे या कारवाईमुळे स्पष्ट झाले आहे.
‘’एफडीए’च्या तपासणीत कॅन्टीन संचालकाने अन्न व्यावसायिक कायद्याच्या कलमांचे गंभीर उल्लंघन केले आहे. यात अन्न व्यवसाय कायदा कलम 26(2) (ळळळ) सहवाचन कलम 31 (1)अन्न सुरक्षा व मानदे (अन्न व्यवसाय व परवाना नोंदणी) विनियम, 2011 विनियम 2.1.2(1)या कायद्यानुसार विनापरवाना अन्न व्यवसाय करणे हा गंभीर गुन्हा असून, अन्न सुरक्षा अधिनियमातील कलम 63 नुसार हा प्रकार कठोर शिक्षेस पात्र आहे. त्यामुळे अन्न व सुरक्षा अधिकारी गजानन गोरे यांनी कुलसचिवांना पत्र देऊन या विनापरवाना कॅन्टीनला तात्काळ प्रतिबंध घालण्याचे आणि पुढील अन्न व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.




