नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटी, शासकीय रुग्णालये वार्‍यावर

आ.विजय वडेट्टीवार यांचा राज्यसरकारवर जोरदार प्रहार

डफरीन रुग्णालयाच्या अग्निकांडावरून घेतले धारेवर

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी 8 दिवसांचा अल्टीमेटम

अमरावती /26 ऑगस्ट– जिल्हा महिला रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानंतर काँग्रेसने राज्य सरकारला धारेवर धरले आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी डफरीन रुग्णालयाला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आरोग्य विभागासह सार्वजनिक बांधकाम, वीज विभाग आणि संबंधित उपकरणे पुरविणार्‍या संस्थांचीही सखोल चौकशी करण्याची मागणी केली. दोषींवर आठ दिवसांत कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात धरणे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. तसेच जिल्हा स्त्री रुग्णालयाचा 9 कोटींचा प्रलंबित निधी दिला नसल्याचा आरोप केला. तसेच नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटी मंजुर केल्याबाबत राज्यसरकारला धारेवर घेतले.
आ. वडेट्टीवार म्हणाले की, रुग्णालयात उपचारासाठी दाखल नवजात बालकांच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची होती. आग लागल्यानंतर सुरक्षा व्यवस्था किती सक्षम होती, उपकरणांची नियमित तपासणी झाली होती का आणि आपत्कालीन परिस्थितीत बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची व्यवस्था किती प्रभावी होती, याची उत्तरे चौकशीत मिळाली पाहिजेत. चौकशी केवळ प्राणवायू उपकरणापुरती मर्यादित न ठेवता संबंधित सर्व विभागांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली. या पाहणीवेळी माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी आ. प्रा. वीरेंद्र जगताप, काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, मनपातील नेते प्रतिपक्ष व माजी महापौर विलास इंगोले, स्वीकृत पार्षद व माजी महापौर मिलिंद चिमोटे, नगरसेवक संजय शिरभाते, काँग्रेस प्रदेश सचिव किशोर बोरकर, महिला शहराध्यक्ष जयश्री वानखडे, माजी महिला शहराध्यक्ष अंजली ठाकरे, सुरेश रतावा, संकेत कुलट व अनिकेत ढेंगळे यांच्यासह काँग्रेस, युवक काँग्रेस व एनएसयूआयचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरील आगीने बाधित कक्षाची पाहणी केल्यानंतर आ. वडेट्टीवार यांनी वापरातील प्राणवायू उपकरणांच्या गुणवत्तेवरही प्रश्न उपस्थित केला. काही उपकरणे निकृष्ट दर्जाची असल्याची माहिती मिळाल्याचा दावा त्यांनी केला. मात्र उपकरणामुळेच आग लागली, हे अधिकृत चौकशीत अद्याप स्पष्ट झालेले नाही. तीन नवजात बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत देण्याची मागणीही त्यांनी केली. तसेच जीव धोक्यात घालून बालकांना वाचविणार्‍या कंत्राटी परिचारिकांना विशेष पुरस्कार देण्याची मागणी केली. कंत्राटी कर्मचार्‍यांना कमी मानधन मिळत असल्याचा आरोप करत त्यांच्या वेतन व्यवस्थेचीही चौकशी करावी, असे ते म्हणाले. कुंभमेळ्यासाठी सुमारे 35 हजार कोटी रुपये खर्च करता येतात तर रुग्णालये, शाळा, डॉक्टर, शिक्षक आणि मूलभूत सुविधांसाठी पुरेसा निधी का दिला जात नाही, असा सवालही आ. वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. धार्मिक आयोजनाला काँग्रेसचा विरोध नसून आरोग्य, शिक्षण, पाणी आणि स्वच्छता या मूलभूत गरजांना सरकारने प्राधान्य द्यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षा, वीज व्यवस्था, प्राणवायू पुरवठा, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग आणि वैद्यकीय उपकरणांची नियमित तपासणी बंधनकारक करावी, अशी मागणी त्यांनी केली. मागील रुग्णालय दुर्घटनांच्या चौकशी अहवालांवरील कार्यवाहीही जाहीर करावी. चौकशी समितीत विरोधकांचे दोन प्रतिनिधी घ्यावेत, अशी मागणी करत आ. वडेट्टीवार यांनी दोषींना कोणत्याही दबावाखाली संरक्षण मिळू नये, असे स्पष्ट केले.

दोषींवर आठ दिवसांत कारवाई करा
डफरीन रुग्णालयातील आगीप्रकरणी दोषी निश्चित करून आठ दिवसांत कारवाई करण्याची मागणी आ. विजय वडेट्टीवार यांनी केली. कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात धरणे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. तीन मृत नवजात बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत देण्याची मागणी केली. तसेच राज्यभरातील सर्व शासकीय रुग्णालयातील अग्निसुरक्षा, वीज व्यवस्था, प्राणवायू पुरवठा आणि वैद्यकीय उपकरणांची तपासणी करण्याची मागणी केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button