जिल्ह्यातील 28 प्रकल्पांना महारेराची अधिकृत मान्यता
अमरावतीतील गृहप्रकल्पांना मिळणार मोठी गती

विभागातील महत्वाच्या 55 प्रकल्पांच्या कामांचा मार्ग मोकळा
अमरावती/20 एप्रिल- जिल्ह्याच्या बांधकाम क्षेत्रासाठी अत्यंत आनंदाची बातमी असून, महारेराने जिल्हयातील एकूण 28 गृहनिर्माण प्रकल्पांना अधिकृत मंजुरी प्रदान केली आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात राज्यातील मालमत्ता क्षेत्राला उभारी देण्यासाठी महारेराने उचललेल्या पावलामुळे अमरावतीतील घरांचे स्वप्न पाहणार्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विभागातील एकूण 55 प्रकल्पांना मान्यता मिळाली असून, यामध्ये अमरावती जिल्हा आघाडीवर आहे. या निर्णयामुळे बांधकाम व्यवसायात पारदर्शकता येण्यासोबतच गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण होणार आहे.
अमरावती शहर आणि जिल्ह्याचा विस्तार वेगाने होत असतानाच, महारेराच्या या मान्यतेमुळे रखडलेल्या कामांना आता नवी उभारी मिळणार आहे. अमरावती विभागातील जिल्ह्यांचा विचार केल्यास, अकोल्यातील 18, वर्ध्यातील 18, यवतमाळमधील 5, बुलढाण्यातील 4 आणि वाशिम येथील 1 प्रकल्पाचा यात समावेश आहे. मात्र, सर्वाधिक 28 प्रकल्प अमरावतीत मंजूर झाल्याने जिल्ह्याच्या वैभवात भर पडणार आहे. संपूर्ण राज्यात महारेराने 10,379 प्रकल्पांना मंजुरी दिली असून, यात नवीन नोंदणी, जुन्या प्रकल्पांमधील सुधारणा आणि रखडलेल्या कामांना मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे घर खरेदी करताना सामान्यांची होणारी फसवणूक थांबणार असून, बांधकामाचा दर्जा आणि वेळेचे गणित चोख पाळले जाणार आहे.राज्यात पुणे जिल्हा 3,150 प्रकल्पांसह प्रथम क्रमांकावर असला, तरी विदर्भातील 563 प्रकल्पांच्या मंजुरीने नागपूर आणि अमरावती विभागात बांधकामांची मोठी लाट येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महारेरा प्रशासनाने कायदेशीर आणि तांत्रिक बाबींची कसून तपासणी केल्यानंतरच या प्रकल्पांना हिरवा कंदील दाखवला आहे. जर विकासकांनी प्रकल्पात काही बदल केले किंवा कामाला विलंब झाला, तर त्याची रीतसर नोंदणी करणे आता बंधनकारक झाले आहे. या कडक नियमांमुळे ग्राहकांचा पैसा सुरक्षित राहणार आहे. अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण खानदेश आणि मराठवाड्यातही मोठ्या प्रमाणात प्रकल्पांची नोंदणी झाल्याने, आगामी काळात घरबांधणी क्षेत्रात मोठी उलाढाल होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.




