राज्यात 1 हजार 440 डॉक्टरांची नियुक्ती होणार

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची घोषणा

मुंबई/16 ऑगस्ट ; राज्यात येत्या काही दिवसांत 1,440 डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच आणखी 600 डॉक्टरांसाठी जाहिरात काढण्यात आलीय.सुमारे 250 दंतचिकित्सकही लवकरच आरोग्य सेवेसाठी उपलब्ध होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महिला आरोग्य समिती, जन आरोग्य समिती आणि रुग्णकल्याण समितीच्या सदस्यांशी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ऑनलाइन पद्धतीने ‘जन आरोग्य संवाद’ साधला. यावेळी त्यांनी आरोग्य समित्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सहालाखांहून अधिक नागरिकांशी संवाद साधण्यात आला आहे. भविष्यात आणखी चार लाख नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेत त्या सोडविण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सांगितले.या संवादात आरोग्य समित्यांच्या बैठका नियमित होतात का, डॉक्टर वेळेवर उपस्थित राहतात का, डॉक्टरांचा रुग्णांशी योग्य संवाद होतो का आणि रुग्णालयांमध्ये आवश्यक सेवा उपलब्ध आहेत का, याची थेट माहिती घेण्यात आली. स्थानिक पातळीवरील अडचणी समजून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार असल्याचं आबिटकर म्हणाले.
आरोग्य सेवांशी संबंधित तक्रारी आणि समस्या नागरिकांना थेट प्रशासनापर्यंत पोहोचविता याव्यात, यासाठी लवकरच ऑनलाइन पोर्टल कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्याद्वारे नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारली जाईल. स्थानिक बचत गटांच्या माध्यमातून रुग्णांना चांगल्या गुणवत्तेचा सकस आणि पोषक आहार उपलब्ध करून देण्याची व्यवस्थाही निर्माण करण्यात येणार, असेही त्यांनी सांगितले.
माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आरोग्य विभागाशी संबंधित तक्रारींसाठी स्वतंत्र डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्याची सूचना केली. तसेच शासकीय दवाखान्यांमध्ये अनुपस्थित राहणार्‍या डॉक्टरांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आठवड्यातून एक दिवस निश्चित करावा, असेही त्यांनी सुचविले. या सूचनांना आरोग्यमंत्री श्री आबिटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

संबंधित बातम्या

Back to top button