कधी कधी आम्ही ठरवून सभागृह तहकूब करतो

विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हेंनी फोडले सत्ताधारी विरोधकांतील गुपित

नाशिक/1 मार्च -राजकारणात आरोप – प्रत्यारोप नेहमीच सुरू असतात. पण त्यानंतरही पडद्यामागे वेगळीच समीकरणे जुळत असतात. हीच समीकरणे उघड करणारे एक विधान विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी केले आहे. कधी कधी आम्ही ठरवून सभागृह तहकूब करतो, असे सांगत त्यांनी सत्ताधारी व विरोधकांतील पडद्यामागील ’समन्वय’ उघड केला. त्यांच्या या विधानामुळे सभागृहातील गदारोळामागचे खरे राजकारण काय? यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. नाशिक येथील विश्व मराठी संमेलनात बोलताना नीलम गोर्‍हे यांनी वरील खुलासा केला. त्यांना परिसंवादात विधानभवनात होत असलेला गदारोळ हा कोणत्या व्याकरणाचा अलंकार आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्या म्हणाल्या, विरोधक सभागृहात काही प्रश्नांवर गदारोळ घालतात. अर्थातच ते जो गदारोळ करतात त्यांची अपेक्षा असते की, त्यांना बोलायला मिळावे. उदाहरणार्थ, एखाद्या मंत्र्याच्या कार्यालयात पैसे सापडले. अशावेळी विरोधकांना चर्चा करायची असते. पण नियम असा आहे की, त्यांना अगोदर नोटीस द्यावी लागेल. मग मंत्र्यांवर आरोप करता येतील.
8 दिवसांपूर्वी मुंबई – पुणे महामार्ग बंद पडला. पण तो तारांकित प्रश्न होण्यासाठी त्याची मुदत गेलेली असते. विरोधी पक्ष हा त्याचा धर्म व जबाबदारी पाळत असतो. तर सत्ताधारी पक्ष हा बुद्धिबळाच्या पटलावर ज्याप्रमाणे दोन प्रकारची व्यूहरचना केली असते तशाच प्रकारच्या चालीचे पालन करत असतो. त्यातही एक सीक्रेट असते. सकाळीच आम्हाला विरोधक किती वेळ गदारोळ करणार हे ठावूक असते. तुम्ही किती वेळात सभात्याग करणार आहात? असा प्रश्नही आम्ही त्यांना करतो. काहीवेळा पीठासीन अधिकार्‍याने 15 मिनिटे थांबायचे आणि सुरुळीत कामकाज करायचे असेही ठरलेले असते, असे त्या म्हणाल्या.

संबंधित बातम्या

Back to top button