सत्तेत जाताच मग्रुरी, फुटीर खा.संजय दिना पाटील यांची पत्रकारांना धमकी
कॅमेरा बंद करा, नाहीतर मारून पाठवीन

मुंबई/25 जून-ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. संजय दिना पाटील यांनी शिवसैनिकांना ’बॉम्ब टाकून, घरात घुसून मारण्याची’ धमकी दिल्यावरून शिवसेना (उबाठा) नेते खासदार संजय राऊत आक्रमक झाले असून, त्यांनी पोलिस आयुक्तांकडे पाटलांच्या अटकेची मागणी केली आहे. मात्र, या प्रकरणावर जाब विचारणार्या पत्रकारांवरच खासदार संजय दिना पाटील यांचा तोल सुटला. त्यांनी कॅमेर्यासमोर पत्रकारांना अत्यंत खालच्या पातळीची शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली आहे.
खासदार संजय दिना पाटील यांनी नुकतेच एका मुलाखतीत ’माझ्या विरोधात आंदोलन केले तर बॉम्ब टाकेन’ असे वादग्रस्त विधान केले होते. या विधानावर स्पष्टीकरण विचारण्यासाठी गेलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर पाटील संतापले. त्यांनी कॅमेर्यासमोरच आपला तोल गमावला आणि पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. संतापाच्या भरात पाटील म्हणाले: अरे भाई, बस झालं ना आता! किती अति करताय? बंद करा कॅमेरा. मी खासदार आहे हे विसरून जाईन. इज्जत करतोय तर इज्जत राखा. उगाच माझ्या डोक्यात जाऊ नका. मी तुम्हाला घराखाली थांबवतोय, जेवायला देतोय, आणि तुम्ही असे वागताय. आता जर पुन्हा मला विचारायला आलात, तर मार खाणार. मारून पाठवीन तुम्हाला. लिहून घ्या, रेकॉर्ड करा आणि सांगा कमिशनरला. काय कम्प्लेंट करायची ती करा! सत्तेत आल्यावर एका विद्यमान खासदाराचा असा तोल ढळणे आणि थेट पत्रकारांना शिवीगाळ करत धमकावणे, यावरून आता तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
एकनाथ शिंदेंकडून सारवासारव, नकळत शब्द गेले-नुकतेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या हायव्होल्टेज ड्रामावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, या प्रतिक्रियेत शिंदेंनी संजय दिना पाटलांची बाजू सावरण्याचा प्रयत्न करत आपला मोर्चा थेट संजय राऊतांकडे वळवल्याचे पाहायला मिळाले. पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, घडलेल्या प्रकाराबाबत त्यांची खासदार संजय दिना पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे. माझ्याकडून नकळत काही अपमानकारक शब्द गेले असतील तर मी माध्यमांची मनापासून दिलगिरी व्यक्त करेन, असे संजय पाटलांनी सांगितले आहे. पत्रकारांबद्दल चुकीचे बोलण्याचा किंवा त्यांच्या भावना दुखावण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता, अशी सारवासारव शिंदेंनी केली.
सत्तेच्या तुकड्यांवर पाळले जाणारे खा.संजय दिना पाटील म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली कीड!अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचा वज्रघात
प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियासारख्या देशाच्या सर्वोच्च संस्थेचे सदस्यत्व भोगलेल्या खा.संजय दिना पाटील नावाच्या प्रवृत्तीने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला जीवे मारण्याची लायकी नसलेली धमकी देणे, हा त्यांच्या नैतिक दिवाळखोरीचा आणि वैचारिक अधःपतनाचा सर्वात गलिच्छ नीचांक आहे, अशा शब्दांत अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी पाटील यांच्यावर शेलक्या शब्दांत घणाघात केला आहे. खा.संजय दिना पाटील यांच्या लाचार वृत्तीचा समाचार घेताना अनिल अग्रवाल अत्यंत आक्रमकपणे म्हणाले, ज्यांनी केवळ आणि केवळ सत्तेच्या तुकड्यांसाठी, मलईदार पदांसाठी आणि वैयक्तिक स्वार्थापोटी आपली निष्ठा रात्रीतून गहाण ठेवली, ज्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेच्या लाचारीसाठी एकनाथ शिंदे गटात उडी मारली, त्या संजय दिना पाटलांना ’पक्षनिष्ठा’, ’प्रामाणिकपणा’ आणि ’नैतिकता’ या शब्दांची साधी चाडही उरलेली खा.संजय दिना पाटील म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली कीड!-नाही. स्वतःची वैचारिक अस्मिता आणि स्वाभिमान बाजारात विकून सत्तेची उब घेणार्या अशा लाचार आणि पळपुट्या राजकीय उपटसुंभांनी पत्रकारांना धमकावण्याची हिंमत करू नये. अनिल अग्रवाल यांनी पुढे ठणकावून सांगितले की, ज्या खा.संजय दिना पाटलांनी ’प्रेस कॉन्सिल’वर माझ्यासोबत काम करताना पत्रकार संरक्षणाचे ढोंग वेशीवर टांगले होते, आज सत्तेची खोकी आणि गुर्मी डोक्यात गेल्यामुळे ते पत्रकारांना संपवण्याच्या भाषेवर उतरले आहेत. हा महाराष्ट्राच्या सुसंस्कृत आणि पुरोगामी परंपरेला लागलेला काळा डाग आहे. सत्तेच्या नशेत माजलेल्या या प्रवृत्तीची राजकीय मस्ती कशी जिरवायची, हे महाराष्ट्रातील पत्रकार चांगल्या प्रकारे जाणतात. खा.संजय दिना पाटील यांनी तात्काळ आणि नाक घासून माफी मागावी; अन्यथा राज्यभरातील पत्रकार रस्त्यावर उतरून त्यांच्या या गुंडशाहीचा, सत्तेच्या लाचारीचा आणि नैतिक अधःपतनाचा बुरखा चव्हाट्यावर टराटरा फाडल्याशिवाय शांत बसणार नाहीत!असे अनिल अग्रवाल यांनी ठणकावून सांगितले.




