महाराणी ताराराणी जैन समुदायाच्या होत्या
जैन आचार्यांच्या दाव्यामुळे इतिहास अभ्यासक संतप्त

मुंबई/31 मार्च- महावीर जयंती निमित्त जैन समुदायाकडून आयोजित एका कार्यक्रमात जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी इतिहासातील विविध दाखले देताना स्वराज्याच्या इतिहासात आपल्या पराक्रमाने औरंगजेबाला जेरीस आणणार्या महाराणी ताराराणी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या, असे वक्तव्य जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी केल्यामुळे सामाजिक आणि राजकीय स्तरावर तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर म्हणाले की, मोहम्मद घोरीने देशावर आक्रमण केले त्यावेळी जैन असलेल्या मेवाडच्या राणीने आपली तलवार काढली. त्यानंतर पुढील अनेक वर्षे आपल्या देशावर कोणी नजर वर करून बघायची हिंमत केली नाही. संस्कार आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी हातात तलवार घेणे याला धर्म म्हणतात. तसेच विक्रमादित्य यांनी पूर्ण भारताला स्वतंत्र करण्यात मदत केली. महत्त्वाचे म्हणजे औरंगजेब याने संभाजी महाराजांना पकडून त्यांचे हाल केले, त्यावेळी आणखी एक जैन महाराणीचा जन्म झाला आणि ती म्हणजे महाराणी ताराराणी, असे विधान केले. मराठीबाबतही बोलताना जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर म्हणाले की, एकट्या महाराष्ट्रात 1 कोटी 12 लाख जैन आहेत. खरं तर मराठी भाषेची रचना जैन आचार्यने केली आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात जेवढे खरे मराठी जर कोणी असतील, तर ते सगळे जैन आहेत. जेवढे पाटील आहेत, ते सर्व जैन धर्म पाळतात. पाटील, चौघुले आणि सरनाईक हे सगळे जैन आहेत. महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना आणि पहिला फिल्म स्टुडिओ जैनने सुरू केला, असा दावाही जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी केला.




