अतीब रशीदची दोषमुक्तीची याचिका फेटाळली
उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपी

एनआयए न्यायालयाचा अमरावती प्रकरणात मोठा धक्का
मुंबई /7 ऑक्टोबर : अमरावतीमध्ये 21 जून 2022 रोजी फार्मासिस्ट उमेश कोल्हे यांची हत्या झाली. याप्रकरणी आरोपी अतीब रशीदला मुंबईच्या विशेष एनआयए न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने रशीदची दोषमुक्तीची याचिका फेटाळली आहे. विशेष सत्र न्यायाधीश चकोर एस. बाविस्कर यांनी म्हटले आहे की, आरोपीविरुद्ध खटला चालवण्यासाठी प्रथमदर्शनी पुरेशी कारणे अस्तित्वात आहेत. न्यायालयाने हे देखील मान्य केले की, आरोपपत्रात सादर केलेले पुरावे आरोपीविरुद्ध गंभीर आणि सबळ पुरावे सादर करतात. हे प्रकरण जून 2022 मधील आहे. उमेश कोल्हे यांची चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. तपासानुसार, कोल्हे यांनी तत्कालीन निलंबित भाजप नेत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमुळे त्यांच्याविरुद्ध कट रचण्यात आला आणि त्यांची हत्या करण्यात आली, असा एनआयएचा आरोप आहे. या प्रकरणात, एनआयएने अतीब रशीदसह 11 आरोपींना अटक केली आहे. आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली, तसेच बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायद्याच्या (यूएपीए) कलमांखालीगुन्हा दाखल करण्यात आला आहे.न्यायालयाने स्पष्ट केले की, आरोपपत्रात सादर केलेल्या पुराव्यांवरून प्रथमदर्शनी आरोपी एक समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकमेकांशी जोडलेले होते. न्यायालयाच्या मते, फिर्यादी पक्षाने सादर केलेल्या पुराव्यांवरून हे देखील उघड होते की, कोल्हे यांच्या हत्येमागील हेतू जनतेच्या एका विशिष्ट वर्गात भीती निर्माण करणे हा होता. न्यायालयाने हे मान्य केले की, आरोपींविरुद्ध उपलब्ध असलेले पुरावे इतके व्यापक आहेत की, या टप्प्यावर त्यांच्या दोषमुक्तीची विनंती स्वीकारली जाऊ शकत नाही. रशीदच्या वकिलाने न्यायालयात युक्तिवाद करत, त्याला या प्रकरणात खोट्या आरोपांखाली गोवण्यात आल्याचे म्हटले. तसेच त्याला थेट हत्येशी जोडणारा कोणताही पुरेसा पुरावा नाही. बचाव पक्षाने असाही युक्तिवाद केला की, रशीद कोणत्याही प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचा सदस्य नव्हता आणि त्यामुळे त्याच्यावर यूएपीएची कलमे लागू करू नयेत. तथापि, न्यायालयाने हे युक्तिवाद स्वीकारले नाहीत.
फिर्यादी पक्षानुसार उमेश कोल्हे यांच्या हत्येनंतर रशीदने आरोपी इरफानला एक संदेश पाठवला होता. तपास यंत्रणेचा दावा आहे की, या संदेशात कोल्हे यांच्याबद्दल अपमानजनक टिप्पणी होती आणि त्यांच्या हत्येची माहिती देण्यात आली होती. एनआयएचा असाही आरोप आहे की, तपासाशी संबंधित डिजिटल पुरावे नष्ट करण्यासाठी रशीदने स्वतःच्या आणि इतर आरोपींच्या मोबाईल फोनमधील डेटा पुसून टाकला. न्यायालयासमोर सादर केलेल्या सामग्रीमध्ये डिजिटल, इलेक्ट्रॉनिक आणि तोंडी पुराव्यांचा समावेश होता. फिर्यादी पक्षाच्या म्हणण्यानुसार, हत्येपूर्वी आणि नंतर रशीद तसेच इतर आरोपींमध्ये अनेक फोन संभाषणे झाली होती. घटनास्थळाजवळ रशीदच्या उपस्थितीचे सीसीटीव्ही फुटेजही सादर करण्यात आले. या परिस्थिती आणि आरोपपत्रात सादर केलेल्या इतर सामग्रीचा विचार करता, न्यायालयाने आरोपीला दोषमुक्त करण्यास कोणताही आधार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानतंर विशेष एनआयए न्यायालयाने अतीब रशीदचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला.





