नवसारीत भव्य क्रीडा संकुल साकारणार

राज्य शासनाची अमरावतीकरांना मोठी भेट

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत भरघोस वाढ

मुंबई/1 एप्रिल : अमरावतीकरांच्या स्वप्नांना आता नवी उभारी मिळणार असून, नवसारी भागातील 16 हजार 708 चौरस मीटरची मोकळी जमीन भव्य क्रीडा संकुलासाठी देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत केवळ खेळाडूच नव्हे, तर शेतकरी, दिव्यांग विद्यार्थी आणि शासकीय कर्मचार्‍यांसाठीही आनंदाची बातमी देण्यात आली आहे. विशेषतः अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला पाणी आणि राज्यातील 54 प्रदूषित नद्यांचे रूप पालटण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची घोषणा करून सरकारने विकासाचा चौफेर धडाका लावला आहे.
अमरावती महानगरपालिकेची आर्थिक ओढाताण लक्षात घेता, सरकारने ही मौल्यवान जमीन थेट महापालिकेच्या स्वाधीन करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे स्थानिक खेळाडूंना आता हक्काचे मैदान मिळणार असून, जिल्ह्याच्या क्रीडा वैभवात मोठी भर पडणार आहे. याच बैठकीत अहमदनगरमधील साकलाई उपसा सिंचन योजनेसाठी 1 हजार 234 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली, ज्याचा फायदा  32 गावांतील कोरडवाहू शेतीला होईल. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ’महाराष्ट्र नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्याचा निर्णय झाला असून, राज्यातील नद्या आता मोकळा श्वास घेणार आहेत. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा अभ्यास करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रातही मोठा बदल करताना, मागील 12 वर्षांपासून प्रलंबित असलेला दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न सरकारने मार्गी लावला आहे. आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना आता वाढीव शिष्यवृत्ती मिळणार असल्याने त्यांना मोठा आधार मिळाला आहे. महसूल विभागातही बदल करून ’भूकरमापक’ या पदाचे नाव आता ’परिरक्षण भूमापक’ असे करण्यात आले आहे. आयुक्ता सौम्या शर्मा यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून कामाला गती देण्याचे संकेत दिले आहेत.

Back to top button