लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध हे ‘चारित्र्यावर डाग’ नाहीत

सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

नवी दिल्ली/8 जून– दोन अविवाहित प्रौढ व्यक्तींमध्ये परस्पर संमतीने निर्माण झालेले शारीरिक संबंध हे त्यांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे कारण ठरू शकत नाहीत, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. तसेच, प्रत्येक प्रेमसंबंधाचा शेवट विवाहातच व्हावा, अशी अपेक्षा करता येत नाही आणि केवळ संबंध विवाहात रूपांतरित झाला नाही म्हणून एका पक्षाने दुसर्‍याची फसवणूक केली, असा निष्कर्ष काढता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायमूर्ती मनमोहन आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने तेलंगणा राज्यस्तरीय पोलीस भरती मंडळाला एका उमेदवाराची पोलीस कॉन्स्टेबलपदी नियुक्ती करण्याचे निर्देश देताना ही निरीक्षणे नोंदवली. अपयशी प्रेमसंबंधाशी संबंधित गुन्हेगारी प्रकरणामुळे संबंधित उमेदवाराची नियुक्ती रद्द करण्यात आली होती. खंडपीठाने म्हटले की, दोन अविवाहित प्रौढांमधील परस्पर संमतीने असलेले संबंध हे त्यांच्या चारित्र्याबाबत प्रतिकूल धारणा निर्माण करण्याचा आधार ठरू शकत नाहीत. अशा संबंधांवर बंदी घालणारा कोणताही कायदा अस्तित्वात नाही.
समझोता म्हणजे गुन्ह्याची कबुली नव्हे -लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या प्रकरणात लोकअदालतीत झालेला समझोता हा आरोपीने गुन्हा कबूल केल्याचा पुरावा मानता येत नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, पीडितेवर समझोत्यासाठी दबाव आणल्याचे कोणतेही पुरावे नसताना नियोक्त्याने त्यातून प्रतिकूल निष्कर्ष काढू नये, असे न्यायालयाने नमूद केले.

संबंधित बातम्या

Back to top button