कौटुंबिक वाद आणि मानसिक तणावातून घडली घटना

4 मुलांना विहिरीत ढकलून हत्या, बापाची आत्महत्या

बुलडाणा/25 मे- बुलडाण्यामध्ये कौटुंबिक वादातून बापाचे टोकाचे पाऊल उचललं. बापाने चार चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे राजुरा धरण परिसर हादरला. विहिरीमध्ये एकाच कुटुंपातील 5 जणांचे मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली. या पाचही जणांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. जळगाव जामोद पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरात रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एका शेतातील विहिरीत एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. कौटुंबिक वादातून पित्याने आपल्या चार लहान मुलांना विहिरीत ढकलून नंतर स्वतःही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.मृत व्यक्तीचे नाव विजय मुसा किराडिया असे असून तो जळगाव जामोद तालुक्यातील भाले अंजन गावात राहणारा होता. या व्यक्तीला 4 मुलं होती. प्रित किराडिया (वय 7 वर्षे)), प्राची किराडिया (वय 5 वर्षे), पूर्वी किराडिया (वय 4 वर्षे) आणि पियुष किराडिया (वय 2 वर्षे) अशी त्याच्या 4 मुलांची नावं होती. विजय किराडिया आपल्या चार मुलांना सोबत घेऊन विहिरीवर गेला. आधी त्यावे चारही मुलांना विहिरीत ढकलून देत त्यांची हत्या केली. त्यानंतर त्यानेही विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विजय किराडिया याची पत्नी घरगुती वादातून माहेरी निघून गेली होती. रविवारी सकाळी विजय घरातील काम करत असताना त्याच्या वडिलांनी तू स्वतः काम का करतो, तुझी बायको कुठे गेली? असा प्रश्न विचारला. त्यानंतर मानसिक तणाव आणि कौटुंबिक वादातून विजयने आपल्या चारही चिमुकल्यांना राजुरा धरण परिसरातील विहिरीत ढकलून स्वतःही विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.

संबंधित बातम्या

Back to top button