विलासनगरच्या मारहाण प्रकरणातील रितिक बागडेला जामीन
अॅड. जैनब मुर्तूजा आझाद यांचा प्रभावी युक्तिवाद

गाडगेनगर पोलीस ठाणे हद्दीतील घटना
अमरावती/23 नोव्हेंबर – शहरातील गाडगेनगर पोलीस ठाणे हद्दीतील लोहार लाईन, विलासनगर परिसरात झालेल्या गंभीर मारहाण प्रकरणातील आरोपी क्रमांक 3 रितिक सुनील बागडे याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात आरोपीच्या वतीने वकील अॅड. जैनब मुर्तूजा आझाद यांनी न्यायालयात अत्यंत प्रभावी बाजू मांडली. या युक्तिवादाला वकील अॅड. वासिक, अॅड. आकाश, शहाबुद्दीन यांनी मोलाची साथ दिली.
या प्रकरणात तक्रारदार आणि आरोपींची आधीपासूनच ओळख होती. घटनेपूर्वी त्यांच्यात आपसात वाद आणि शाब्दिक बाचाबाची झाली होती. याच वादातून आरोपींनी तक्रारदाराशी गंभीर मारहाण केल्याचा आरोप पोलिसांनी सादर केलेल्या कोठडी अहवालात केला आहे. जखमी तक्रारदारावर अमरावती येथील स्काय बहुविध उपचार रुग्णालयात उपचार सुरू असल्याची नोंद कागदपत्रांमध्ये आहे.
पोलिसांनी या तपासात घटनास्थळावरील पुरावे, शस्त्र, कपडे आणि रक्ताचे नमुने जप्त करून पुढील तपास प्रस्तावित केला होता. मात्र, वकील अॅड. जैनब मुर्तूजा आझाद यांनी उपलब्ध कायदेशीर बाबी आणि कागदपत्रांच्या आधारे न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. त्यांच्या या प्रभावी कायदेशीर मांडणीमुळे न्यायालयाने रितिक सुनील बागडे याला दिलासा देत जामीन मंजूर केला.
असा आहे संपूर्ण घटनाक्रम आणि गुन्हा
19 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 1 वाजता लोहार लाईन, विलासनगर, गाडगेनगर येथे ही घटना घडली. तक्रारदाराच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा क्रमांक 119/2026 अन्वये तीन आरोपींवर गुन्हा नोंदवला. यामध्ये चाकूचा वापर करून गंभीर दुखापत केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी 20 सप्टेंबर 2026 रोजी रितिक सुनील बागडे (वय 26) याच्यासह तिघांना अटक केली होती.





