अकोला, वर्धा 45 अंश सेल्सिअसवर
देशात सर्वाधिक ‘हॉट’

अकोला/24 एप्रिल: उष्णतेच्या लाटेने विदर्भ होरपळून निघत असून रविवारी तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसवर पोहोचला. देशात रविवारी सर्वाधिक 45 अंश सेल्सिअस तापमानअकोला आणि वर्धा येथे नोंदविण्यात आले. विदर्भातील सर्व शहरांचे तापमान 41 अंशांच्या पुढे गेले असून नागपूर व अमरावती येथेही तापमान 44 अंशांच्या वर नोंदविण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे आणि तापमानात सातत्याने वाढ होत आहे. शनिवारी काही भागात ढगाळ वातावरणामुळे तापमानात किंचित घट झाली होती; मात्र त्यानंतर पुन्हा तापमानात मोठी वाढ झाली. अकोल्याचे तापमान एका दिवसात 1.7 अंशांनी वाढले. रविवारी पुन्हा एकदा देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भातील अकोला व वर्धा येथे झाली. यंदाच्या उन्हाळ्यात प्रथमच तापमान 45 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. एकीकडे विदर्भात उष्णतेची लाट असताना हवामान खात्याने सोमवार व मंगळवार या दोन दिवसांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसासह वादळी वार्यांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे उष्णतेने होरपळलेल्या विदर्भाला पुढील काही दिवसांत दिलासा मिळण्याची शक्यता आहे.




