निवडणूक अधिकार्‍यांची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

दुर्लक्ष केल्याचा एमआयएम उमेदवार डोंगरदिवे यांचा आरोप

अंजनगाव सुर्जी/2 डिसेंबर  : नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक स्थगित झाल्यानंतरही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहत असल्याचा आरोप एमआयएम पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनीत डोंगरदिवे यांनी केला आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान मनमानी, भेदभाव, विलंब आणि नियमांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याच्या आरोपांसहित त्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे सविस्तर तक्रार दाखल केली आहे.
डोंगरदिवे यांच्या म्हणण्यानुसार, घराघर संपर्क मोहिमेच्या पुराव्यांची मनमानी तपासणी करण्यात आली. त्यांनी सादर केलेल्या भेटींच्या नोंदी योग्य प्रकारे स्वीकारल्या गेल्या नाहीत, उलट अडथळे निर्माण करण्यात आले. दस्तऐवज तपासणीच्या प्रक्रियेत भेदभावपूर्ण वागणूक दिल्याचा आणि काही उमेदवारांना जाणीवपूर्वक अडचणीत आणल्याचा आरोपही तक्रारीत नमूद आहे. नामांकन अर्ज स्वीकारताना झालेल्या विलंबामुळे उमेदवारांना शारीरिक आणि मानसिक ताण सहन करावा लागला, असा आरोप डोंगरदिवे यांनी केला. प्रचारासाठी लागणार्‍या परवानग्यांमध्ये अनावश्यक शुल्क आकारले गेल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. याशिवाय न्यायालयाने आदेशित केलेल्या कागदपत्र तपासणीची अंमलबजावणी संबंधित अधिकार्‍यांनी न केल्याने न्यायप्रक्रियेवर परिणाम झाला, असे त्यांनी म्हटले आहे. अधिकार्‍यांच्या वर्तणुकीमुळे निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास कमी होत असून मतदार आणि नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण तयार झाल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. डोंगरदिवे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निर्णय अधिकारी आणि सहाय्यक अधिकार्‍यांची तात्काळ बदली, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि नियमांनुसार राबविण्याची मागणी केली आहे. अंजनगाव सुर्जी नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या या तक्रारीमुळे स्थानिक राजकीय वातावरणात नवे घडामोडी सुरु झाल्या असून, जिल्हाधिकार्‍यांचा पुढील निर्णय आगामी निवडणूक प्रक्रियेवर मोठा परिणाम करू शकतो, अशी चर्चा सुरू आहे.

संबंधित बातम्या

Back to top button