शहरातील रेल्वे स्थानक हटविण्याचे षडयंत्र

काँग्रेसचा जोरदार विरोध

* सामान्य नागरिकांना एकजूट होण्याचे आवाहन

* बबलू शेखावत, मिलिंद चिमोटे यांनी थोपटले दंड

अमरावती /2 डिसेंबर : शहराचा इतिहास, मानबिंदू आणि ओळख ठरलेले ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानक पाडून ती मोलाची जमीन भूमाफियांना देण्याचा मोठा डाव सत्ताधार्‍यांकडून खेळला जात असल्याचा काँग्रेस पक्षाने जोरदार ठपका ठेवला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील कोट्यवधींचे भूखंड व्यापार्‍यांच्या हातात देण्यासाठी महायुतीचे नेते नियोजनबद्ध कारवाई करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे.
काँग्रेसचा आरोप आहे की, शहरातील नागरिकांना न कळू देता स्थानक हटविण्याची प्रक्रिया अनेक महिन्यांपासून ‘गुप्तपणे’ राबवली जात आहे. अचानकपणे स्थानक ते राजकमल चौक उड्डाणपूल बंद करून वाहतुकीला ठप्प करणे, खासगी संस्थेकडून पुलाचे स्ट्रक्चरल परीक्षण करवून घेणे आणि दुरुस्तीची कोणतीही कामे न सुरू करणे-या सार्‍या हालचालींचा अंतिम उद्देश रेल्वे स्थानक पाडणे हाच आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.
या संपूर्ण प्रस्तावाला भाजपचे राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांनी दिलेली उघड पाठराखण म्हणजे संपूर्ण कट कारस्थानाची अधिकृत कबुलीच असल्याचा ठपका काँग्रेसने ठेवला आहे. या प्रस्तावाला केंद्रीय मंत्री आणि राज्य सरकारनेही मान्यता दिली असल्याचे बोंडे यांच्या भाषणातून स्पष्ट झाले असून, वरिष्ठ पातळीवरूनच हा कट शिजविला गेला असल्याचा काँग्रेसचा दावा आहे. अमरावतीच्या विकासाची खरी सुरुवात रेल्वे स्थानकामुळे झाली. शहर राष्ट्रीय रेल्वे नकाशावर स्थान मिळाले ते याच स्थानकाच्या माध्यमातून. मुंबई, तिरुपती, जबलपूर, सूरत अशा गाड्यांमुळे शहराची प्रचंड वाढ झाली. अनेक वर्षांपासून हा वारसा सांभाळत असलेले हे स्थानक आता भूमाफियांना देण्याचा प्रयत्न नागरिकांप्रती विश्वासघात असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.
इतकेच नव्हे तर, शहर नियोजनाच्या अधिकृत प्रक्रिया डावलून एका खासगी अभियंत्याचा अहवाल घेऊन संपूर्ण स्थानक हटविण्याचा आराखडा पुढे नेणे-ही बाब अधिकच संशयास्पद असल्याचा काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला आहे. नगररचना विभागाकडून कोणतीही तपासणी न करता खाजगी अहवालावर आधारित निर्णय घेणे म्हणजे भूमाफियांना थेट फायदाच मिळवून देणे, असा ठपका विरोधकांनी ठेवला आहे. वाहतूक कोंडीचे कारण पुढे करून स्थानक हटविण्याचे स्पष्टीकरण देणे हास्यास्पद आणि दिशाभूल करणारे असल्याचे काँग्रेसचे मत आहे. भारतभरातील कोणत्याही शहरात रस्त्यांच्या समस्येमुळे रेल्वे स्थानके पाडली गेलेली नाहीत. रस्ते सुधारले जातात-स्थानके उध्वस्त केली जात नाहीत, असे काँग्रेसने ठामपणे म्हटले आहे. शहरातील शासकीय जमिनी व्यापारी वर्गाच्या हातात जाण्याच्या पाठीमागे मोठे आर्थिक हितसंबंध असल्याचा संशय व्यक्त करून काँग्रेसने म्हटले की, या सर्व डावातील खरे लाभार्थी कोण आहेत, त्यांचे सत्ताधार्‍यांशी आर्थिक संबंध किती खोलवर आहेत-याचा लवकरच भांडाफोड केला जाईल.अमरावतीचे अभिमानस्थान असलेल्या रेल्वे स्थानकाला हात लावण्याचा हा कट कोणत्याही परिस्थितीत सफल होऊ देणार नाही, असा निर्धार काँग्रेसने व्यक्त केला. शहरातील सर्वच घटक-उद्योजक, वकील, डॉक्टर, शिक्षक, अभियंते, विद्यार्थी आणि सामान्य नागरिक यांनी एकजूट होऊन या कटाचा विरोध करावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी पत्रकार परिषदेत मिलींद चिमोटे, बबलू शेखावत, समीर जवंजाळ, वैभव देखमुख, जयश्री वानखडे, नीतीन काळे आणि संकेत कुलट यांनी अमरावती शहराच्या अस्तित्वाशी निगडित या गंभीर प्रश्नावर मोठे जनआंदोलन उभारण्याची घोषणा केली.

संबंधित बातम्या

Back to top button