निवडणूक स्थगित करण्याचा आयोगाचा निर्णय चुकीचा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तीव्र नाराजी

मुंबई/2 डिसेंबर -राज्यातील 22 नगरपरिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका अचानक पुढे ढकलल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या निर्णयावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार आक्षेप नोंदवला आहे. ते म्हणाले की, निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे.
माझ्या अभ्यासानुसार निवडणुका पुढे ढकलता येत नाहीत. उद्या निवडणुका होणार असताना आज त्या पुढे ढकलणे अत्यंत चुकीचे आहे. अनेक उमेदवारांची मेहनत वाया गेली आहे. निवडणूक आयोग स्वायत्त असला तरी अशा प्रकारचा निर्णय चुकीचा आहे. त्यांनी याबाबत रिप्रेझेंटेशन निवडणूक आयोगाला पाठविण्याची तयारी असल्याचेही सांगितले. न्यायालयीन प्रक्रियेमुळे या निवडणुकांचा वेळ बदलण्यात आला असून, ज्या ठिकाणी मतदान पुढे ढकलले गेले आहे तिथे आता 20 डिसेंबरला मतदान होईल आणि 21 तारखेला मतमोजणी होणार आहे. उर्वरित ठिकाणांवरील निवडणुका मात्र ठरल्याप्रमाणे 2 डिसेंबरला पार पडणार आहेत. स्थगित झालेल्या नगरपरिषदांमध्ये अमरावती विभागातील बाळापूर, अंजनगाव सुर्जी, यवतमाळ, देऊळगाव राजा, वाशिम; कोकण विभागातील अंबरनाथ; छत्रपती संभाजीनगर विभागातील फुलंब्री, धर्माबाद, मुखेड, रेणापूर, वसमत; नागपूर विभागातील घुग्घूस, देवळी; नाशिक विभागातील देवळाली-प्रवरा, कोपरगाव, पाथर्डी, नेवासा; पुणे विभागातील बारामती, फुरसुंगी-उरळी देवाची, महाबळेश्वर, फलटण, मंगळवेढा, अनगर यांचा समावेश आहे. निलंगा नगरपरिषदेची निवडणूक ऐनवेळी स्थगित करण्यात आली. यामुळे काँग्रेस पक्ष, वंचित बहुजन आघाडी, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, त्यांचे कार्यकर्ते आणि उमेदवार संतप्त झाले. निलंग्याच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत जोरदार आंदोलन करण्यात आलं. प्रशासन आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सर्व नियमांचे पालन करून निवडणूक प्रक्रिया पार पडली जात असते. मात्र ऐनवेळी असा निर्णय कसा येऊ शकतो असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.

संबंधित बातम्या

Back to top button