दोन्ही ठिकाणी विविध पक्षांची भारतीय जनता पार्टी सोबतच लढत

नगरसेवक पदाच्या निवडणुकीत मात्र सर्वत्र विविधांगी चित्र

वरुड । 1 डिसेंबर – शेंदुरजनाघाट आणि वरुड नगरपरिषद होणार्‍या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये खरी लढत दिसत असली तरी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासह इतरही उमेदवारांनी या निवडणुकीत अनेकांना नाकी नौ आणले आहेत, रिंगणात असलेले सर्वच जरी निवडुन येणार नसले तरी अनेक उमेदवार मात्र कुणाचा तरी पराभव करणार, एवढे मात्र निश्चित. वरुड नगरपरिषदेमध्ये एकूण 40 हजार 890 मतदार असून शेंदुरजनाघाटमध्ये 18 हजार 793 मतदारांना या प्रक्रियेमध्ये सहभाग घेता येणार आहे. दरम्यान या निवडणुकरीता नगरपरिषद, महसुल आणि पोलिस प्रशासनाच्या वतीने जयत तयारी करण्यात आली आहे.
शेंदुरजनाघाट आणि वरुड नगरपरिषदेच्या नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाची निवडणुक उद्या 2 डिसेंबरला होऊ घातली असून वरुड नगरपरिषदेमध्ये 26 नगरसेवकांच्या निवडीकरीता आता एकूण 117 उमेदवार रिंगणात आहेत तर शेंदुरजनाघाट नगरपालिकेमध्ये 20 नगरसेवकांच्या निवडीकरीता आता एकूण 82 उमेदवार रिंगणात आहेत. वरुडमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत 9 उमेदवार तर शेंदुरजनाघाटमध्ये 6 उमेदवार निवडणुक रिंगणात एकमेकांविरोधात रिंगणात आहेत. शेंदुरजनाघाट नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदाकरीता भाजपाच्या वतीने सुवर्णा हरिभाऊ वरखडे, शिवसेना शिंदे  गटाच्या वतीने मीना श्रीराम कोकोडे, शिवसेना उभाठा तर्फे प्रांजली कपिल तरार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे वतीने शुभांगी संतोष धुर्वे, अपक्ष माला अजय कंगाले आणि करिष्मा शिकल धुर्वे हे रिंगणात आहेत तर वरुड नगरपरिषदेत नगराध्यक्षपदाकरीता अपक्ष धर्मेंद्र मनीराम उईके, शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सुनील किसनाजी तुमराम, महाविकास आघाडीचे वतीने प्रशांत प्रल्हादराव धुर्वे, अशोक पुनाजी पंधरे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वतीने चेतना राहुल बेलसरे, अपक्ष सुनील नत्थुजी वटके, अपक्ष सीमा अनिलराव सयाम, भाजपाच्या वतीने ईश्वर शिवकुमार सलामे, अपक्ष दिपांशु दीपक सलामे हे निवडणुक रिंगणात आहेत.
वरुड शहरात विद्यमान आमदार चंदु उर्फ उमेश यावलकर, माजी आमदार देवेंद्र भुयार, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्यासह अनेकांनी मतदारांना भेटून आपल्याच उमेदवारांना मते देण्याचे आवाहन केले.
दोन्ही नगरपरिषदांमध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. वरुड नगरपरिषद निवडणुकीत निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन उपविभागीय अधिकारी प्रदीपकुमार पवार तर सहायक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन वरुडचे मुख्याधिकारी गजानन भोयर, अतिरिक्त सहायक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन नायब तहसिलदार नामदेव गडलिंग काम पाहात आहेत तर शेंदुरजनाघाट नगरपरिषद निवडणुकीत निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन तहसिलदार रामदास शेळके तर अतिरिक्त सहायक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन नायब तहसिलदार पंकज चव्हाण व शेंदुरजनाघाटचे मुख्याधिकारी विक्रम शिरके काम पाहात आहेत. निवडणुक विभगााच्या वतीने निवडणुकीची संपुर्ण तयारी पुर्ण झाली असून उद्या सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदारांना मतदान करता येणार आहे. वरुड नगरपरिषदेमध्ये एकूण 40 हजार 890 मतदार असून त्यामध्ये 20 हजार 481 पुरुष तर 20 हजार 409 महिला मतदारांचा समावेश आहे तर शेंदुरजनाघाटमध्ये 18 हजार 793 मतदारांंपैकी त्यामध्ये 9 हजार 637 पुरुष तर 9 हजार 166 महिला मतदारांना या प्रक्रियेमध्ये सहभाग घेता येणार आहे, एकंदरीत या निवडणुकीत विद्यमान आमदार चंदु उर्फ उमेश यावलकर, माजी आमदार देवेंद्र भुयार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button