राहुल गांधी संविधानाच्या कलमांची माहिती द्यावी

नवनीत राणांचे थेट आव्हान

* अकोटच्या प्रचारसभेत काँग्रेसवर जोरदार टीका

अकोला /30 नोव्हेंबर अकोट नगर पालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर तीव्र टीका करत त्यांना थेट आव्हान दिले. संविधानाच्या नावावर काँग्रेस देशभर खोटा गाजावाजा करत असल्याचा आरोप करत राणांनी म्हटले की, राहुल गांधींनी संविधान हातात न घेता त्यातील प्रत्येक कलम आणि त्या कलमांचा उपयोग काय, हे देशाला समजावून सांगावे. ते तसे करून दाखवले, तर मी तत्काळ राजकारण सोडायला तयार आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. राणांनी आरोप केला की काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत ‘संविधान बचाव’च्या नावाखाली दिशाभूल करणारा प्रचार केला आणि त्याचा परिणाम म्हणून अनेक ठिकाणी उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. संविधानाचा खरा अभिमान भाजपच्या नेतृत्वाला असल्याचा दावा करत त्या म्हणाल्या की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संविधानाचा मान राखत संसदेत प्रवेश करण्याची परंपरा निर्माण केली आहे. सभेत काँग्रेसवर ऐतिहासिक टीकास्त्रही त्यांनी सोडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विदर्भातून पराभूत करणारा पक्ष काँग्रेसच असल्याचा उल्लेख करत संविधानाविषयीचे त्यांचे प्रेम ढोंगी असल्याचे त्यांनी म्हटले. लोकांना इतिहास आठवून निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. निवडणूक काळात नेहमी चर्चेत येणार्‍या ‘मतचोरी’च्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना राणा म्हणाल्या की मतचोरी खरोखर होत असेल, तर त्या स्वतः पराभूत कशा झाल्या असत्या? विरोधकांना ठोस मुद्दे नसल्याने असे आरोप उचलले जात असल्याचे त्यांनी सांगितले. मतदान करताना जाती, धर्म, नातेसंबंध बाजूला ठेवून शहराच्या विकासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी जनतेला केले. राणांनी आपल्या भाषणात विकासाच्या राजकारणावर विशेष भर दिला. शहराचा विकास गतीमान करण्यासाठी निधी कुठून मिळू शकतो याचा विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रात नरेंद्र मोदी, राज्यात देवेंद्र फडणवीस आणि स्थानिक पातळीवर भाजपचे प्रतिनिधी असतील, तर विकासाला वेग येईल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या

Back to top button