डॉ.अनिल बोंडे, हर्षवर्धन देशमुख व नरेशचंद्र ठाकरे निवडणुकीतून गायब
वरुड-शेंदुरजनाघाट नगरपरिषद निवडणूक 2025

वरुड । 28 नोव्हेंबर – येत्या 2 डिसेंबर रोजी वरुड आणि शेंदुरजनाघाट नगर परिषदेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या निवडी करता मतदान होणार असुन निवडणुकीचा प्रचार आणि प्रसार शिगेला पोहोचला असतांना निवडणुकीतून माजी मंत्री, माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जातात. एके काळी वरुड शहरासह संपुर्ण तालुक्यातील राजकारण या नेत्यांच्या सभोवताल राहत होते परंतु या निवडणुकीत हे सर्व नेते दिसून येत नसल्यामुळे हे नेते आहेत तरी कुठे? की त्यांचे मतदारसंघातील वजन कमी झाले? यासह अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
मोर्शी मतदारसंघात वरुड तालुका हा अत्यंत महत्त्वपुर्ण समजला जातो वरुड तालुक्यात वरुड आणि शेंदुरजनाघाट या दोन नगरपरिषदा येत असल्यामुळे या तालुक्याला अधिकच महत्त्व आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनचा इतिहास बघितला असता, मोर्शी मतदारसंघात वरुड ते शेंदुरजनाघाट मध्ये आतापर्यंत माजी मंत्र्यांसह आजी-माजी आमदारांची भुमिका अत्यंत महत्त्वपूर्ण राहिली आहे. 2016 च्या निवडणुकीत माजी कृषिमंत्री तथा या भागाचे माजी आमदार डॉ.अनिल बोंडे, माजी कृषिमंत्री तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, माजी आमदार तथा सहकार महर्षी म्हणुन परिचित असलेले नरेशचंद्र ठाकरे हे तिघेही महत्त्वपूर्ण राजकीय नेते म्हणुन गणल्या जात आहेत परंतु हे तिघेही या निवडणुकीमध्ये कुठेही दिसून येत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. वरुड आणि शेंदुरजनाघाट हे दोन्ही शहर राजकीय राजकीय दृष्टीने महत्त्वपूर्ण गणली जातात, अशा स्थितीत आतापर्यंतच्या इतिहासामध्ये या तिन्ही नेत्यांची भुमिका सुध्दा अत्यंत महत्त्वपूर्ण राहिली आहे परंतु या निवडणुकीचा शेवटचा टप्पा येऊन ठेपला असतांना सुद्धा हे तिन्ही नेते राजकारणात कुठेच दिसत नसल्यामुळे त्यांचा चाहता वर्ग आणि काही विशिष्ट मतदार त्यांच्या दर्शनाची कुतूहलतेने वाट बघत आहेत परंतु हे तिन्ही नेते अचानक निवडणुकीतूनच गायब झाल्यामुळे झाले तरी काय? असा प्रश्न या निमित्ताने उभा ठाकला आहे. डॉ.अनिल बोंडे हे भारतीय जनता पार्टीचे नेते असुन राज्यसभा खासदार आणि अमरावती जिल्हा भाजपाचे माजी अध्यक्ष राहले आहेत. आजही त्यांच्या शब्दाला भारतीय जनता पार्टीमध्ये मोठे स्थान आहे, एवढेच नव्हे तर राज्य कार्यकारीणीमध्ये सुद्धा त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे, एवढेच नव्हे तर ते मोर्शी मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. 2016 मध्ये पार पडलेल्या नगर परिषदेच्या दोन निवडणुका त्यांचेच नेतृत्वात लढण्यात आल्या होत्या आणि त्यांनी दोन्ही ठिकाणी भाजपचा झेंडा रोवला होता, अशा स्थितीत या निवडणुकीत मात्र मोर्शी मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना सुद्धा डॉ.अनिल बोंडेच गायब झाल्यामुळे विविध चर्चांना पेव फुटले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत डॉ.बोंडे यांच्या महत्त्वपूर्ण कार्यकर्त्यांची भाजपच्याच वतीने उमेदवारी कापण्यात आल्याने ते गायब तर झाले नाहीत ना? असा प्रश्न या निमित्ताने उभा ठाकला आहे दुसरीकडे आतापर्यंतच्या मोर्शी मतदारसंघाच्या इतिहासात श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी कृषिमंत्री तथा मोर्शी मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन देशमुख यांची भूमिका सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली आहे, यापूर्वी अनेकदा या दोन्ही नगर परिषदेवर त्यांच्याच गटाचे वर्चस्व निवडणुकीच्या माध्यमातून राहिले आहे परंतु या निवडणुकीत हर्षवर्धन देशमुख सुद्धा अचानक गायब झाल्यामुळे त्यांच्या बाबत सुद्धा अनेक प्रश्नचिन्ह आणि समज, गैरसमज वरुड आणि शेंदुजनाघाट शहरांमध्ये दिसून येत आहे. मोर्शी मतदारसंघातील अत्यंत महत्त्वपूर्ण नेते म्हणुन ज्यांच्याकडे बघितले जाते असे माजी आमदार तथा सहकार महर्षी नरेशचंद्र ठाकरे यांची भूमिका सुद्धा वरुड आणि शेंदुरजनाघाट नगरपरिषद निवडणुकीसाठी आतापर्यंत महत्त्वपूर्ण समजली जात होते परंतु या निवडणुकीत नरेशचंद्र ठाकरे हे दिसत नसल्यामुळे त्यांची भुमिका कोणती? त्यांचे नेते आणि कार्यकर्ते कोणती भुमिका घेतात? कोणाला मदत करतात? आणि ते अचानक गायब का झाले? यासह विविध प्रश्न या निमित्ताने सर्वसामान्यांकडून उपस्थित केले जात आहे. हे तिन्ही नेते या निवडणुकीत दिसत नसले तरी ते गायब होण्यामागे वेगवेगळे कारणे आहेत परंतु एवढं नक्की या नेत्यांचे महत्त्व त्या त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून ते तिघेही अचानक निवडणुकीच्या प्रचारातून गायब झाल्यामुळे त्यांचे नेते आणि कार्यकर्ते कोणती भूमिका घेतात? त्यावरच येत्या निवडणुकीतील विजयाची गणिते ठरणार आहे एवढे मात्र निश्चित.




