जिल्ह्यात 11 नगराध्यक्ष पदांसाठी 77 रिंगणात

सदस्य पदांसाठी तब्बल 1329 उमेदवारांनी थोपटले दंड

* एकीकडे पक्षांचे गणित, तर दुसरीकडे स्थानिक गटांचे अस्त्र

* यंदाची लढत जिल्ह्याचा राजकीय नकाशा बदलणारी ठरणार

अमरावती /21 नोव्हेंबर – जिल्ह्यातील 10 नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण होताच जिल्ह्याचे राजकीय तापमान अक्षरशः ढवळून लागले आहे. अंतिम यादीप्रमाणे 11 नगराध्यक्ष पदांसाठी 77 तर 278 सदस्यपदांसाठी तब्बल 1329 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. एकूण 1406 उमेदवारांचे राजकीय भविष्य 2 डिसेंबरच्या मतदान पेटीत बंद होणार असून, तज्ज्ञांच्या मते यंदाची निवडणूक जिल्ह्यातील पुढील पाच वर्षांचे सत्ता-समीकरण पूर्णपणे बदलू शकते.
धामणगाव रेल्वेत भाजप-काँग्रेसची सर्वाधिक प्रतिष्ठेची लढत असून नगरपालिका यंदा जिल्ह्याची ‘बॅटलफिल्ड सीट’ बनली आहे. नगराध्यक्ष पदासाठी सात जण रिंगणात असले तरी खरी लढत फक्त दोन पक्षांमध्ये – भाजपची अर्चना रोठे आणि काँग्रेसची वैशाली देशमुख. धामणगाव हे भाजपसाठी राजकीय वर्चस्वाची जागा मानली जात असल्याने मंत्र्यांपासून संघटनपर्यंत सर्व शक्ती येथे झोकून दिल्या आहेत. काँग्रेससाठी ही जागा गमावणे म्हणजे जिल्ह्यातील राजकीय प्रभाव कमी होण्याचा धोका. म्हणूनच काँग्रेसनेही आपल्या कार्यकर्त्यांची पुन्हा मांडणी करत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सर्व गणिते बदलायला सुरुवात केली आहे. स्थानिक गटबाजी, बंडखोरांचे अस्तित्व, महिला मतदारांची निर्णायक भूमिका आणि अंतर्गत वैर या चार मुद्द्यांवर संपूर्ण धामणगावची लढत फिरताना दिसते आहे.
चिखलदरा शहरात त्रिकोणी संघर्षाने निवडणूक अधिकच रंगली असल्याने पर्यटननगरी चिखलदर्‍यात यंदा ‘वन साईड’ नाही, तर ‘त्रिकोणी सत्तासंग्राम’ सुरू आहे. भाजपचे राजेंद्रसिंह सोमवंशी, काँग्रेसचे शेख अब्दुल शेख हैदर आणि प्रहारची सविता गावंडे – तिन्ही उमेदवारांकडे स्वतःचा मजबूत किल्ला आहे. चिखलदर्‍याची राजकीय पार्श्वभूमी वेगळी असून आदिवासी मतदारसंघाचा प्रभाव, पर्यटनविषयक वचनांची आकर्षकता, पर्यावरणाशी निगडित प्रश्न आणि स्थानिक पातळीवरचे अनेक छोटे गट हे सारे मिळून निवडणूक गुंतागुंतीची झालेली आहे. सामान्यतः चिखलदर्‍यात निकाल अंदाज लावणे अवघड असते; पण यंदा ‘किंगमेकर’ची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार असून अल्प मताधिक्याची शक्यता प्रबळ आहे. जिल्ह्यात बहुकोनी लढतींची ‘ज्वाला’ छोट्या मताधिक्याने उलथापालथ निश्चितच होईल, एवढच काय अमरावती जिल्ह्यातील बहुतांश नगरपरिषदांत बहुकोनी लढतींनी वातावरण तापवले आहे. चार ते दहा उमेदवार एका जागेसाठी स्पर्धेत असल्याने मतांचे मोठे तुकडे होणार हे निश्चित. अनेक प्रभागात स्थानिक गोटे, पिढीजात राजकारण, वैयक्तिक वाद, छोट्या संघटनांचा प्रभाव आणि बंडखोरांची चीड हे घटक सत्तेच्या समीकरणाला कलाटणी देणार आहेत. प्रभारी, जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष आणि माजी आमदारांचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी तेथील लढती अधिक तापल्या आहेत. छाननी आणि माघारीनंतर अनेक ठिकाणी पक्षांचे गणित कोसळले तर काही नगरपरिषदांत छाननीनंतर प्रमुख पक्षांचे ‘धोक्याचे उमेदवार’ बाहेर पडल्याने त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला. तर दुसरीकडे – काही ठिकाणी बंडखोरांनी माघार न घेता स्वतंत्र उभे राहिल्याने पक्षांच्या निवडणूक रणनीती अक्षरशः कोलमडल्या. त्यामुळे अनेक ठिकाणी पक्षांना प्रचाराचे केंद्रबिंदू बदलावे लागले आहेत. जिल्ह्यातील निवडणुकीचा संक्षिप्त राजकीय आढावा घेतला असता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार : 77, सदस्य पदाचे उमेदवार : 1329, एकूण उमेदवार : 1406, धामणगाव रेल्वे : थेट सामना – भाजप विरुद्ध काँग्रेस, चिखलदरा : त्रिकोणी संघर्ष – भाजप, काँग्रेस, प्रहार, अचलपूरमध्ये सर्वाधिक सदस्य उमेदवार : 235 राहणार असून नगरनिहाय राजकीय चित्र अधिक गुंतागुंतीचे निर्माण झाले आहे. त्यामध्ये अचलपूर – 235 उमेदवार : स्थानिक गटांचे वर्चस्व ठरवणारी निवडणूक तर अंजनगाव सुर्जी – 203 उमेदवार : बंडखोरांनी चित्र बदलले व मोर्शी – 141 उमेदवार : काँग्रेस-भाजप व्यतिरिक्त छोट्या संघटना सक्रिय झाल्या असून वरुड – 115, दर्यापूर – 119 : दोन्ही ठिकाणी गावपक्षातील वैर निर्णायक झाल्याचे बोलल्या जात आहे. धारणी, शेंदूरजनाघाट, चांदूर बाजार याभागात स्थानिक गटांचे वेगळे समीकरण पाहायला मिळत आहे.यंदा धामणगाव रेल्वे – 45 सदस्य असून मुख्य लढत थेट द्वंद्वातील होत असल्याचे चित्र आहे. बाकी नगरपरिषदांतही पारंपरिक गटांचा प्रभाव, सत्ताधारी- विरोधकांचे संघर्ष, तसेच नवीन चेहर्‍यांची आक्रमक मोहीम वातावरण तापवत आहे. यावेळी राजकीय उमेदवार प्रचाराच्या ‘फुल स्पीड’ मोड दिसत असून त्यांचा प्रचार सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसायला लागला आहे. नामांकन माघारीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. असून चिन्ह वाटप झाल्यानंतर त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ प्रचार, घरदारे संवाद, पदयात्रा, कोपरा सभा, तरुणांचा वाढता सहभाग पाहायला मिळणार आहे. या सर्वामुळे पुढील आठवडा जिल्ह्यातील सर्वात तापलेला ठरणार आहे. जिल्हा पातळीवरील मोठी नेते मंडळीही आता दौरे सुरू करणार आहेत. 2 डिसेंबरला मतदान होणार असून कोणत्या नगरपरिषदेवर कोणाचा झेंडा? फडकणार यावर यंदाची निवडणुकीतील मतदार बांधव ठरवणार आहे. यंदाची निवडणूक जिल्ह्याचा राजकीय नकाशा मोठ्या प्रमाणात बदलू शकते. स्थानिक पातळीवर अनेक राजकीय घराण्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अनेक नगरपरिषदांत ‘वन मॅन शो’ यंदा संपुष्टात येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. एकूणच अमरावती जिल्ह्यातील 2025 ची नगरपालिका व नगरपंचायत निवडणूक ही सर्वात रोमांचक, बहुपरिमाणात्मक आणि राजकीय शक्तिपरीक्षेची ठरणार आहे.

संस्था                अध्यक्ष             सदस्य
चांदूर बाजार          06                  107
दर्यापूर                  07                  119
चांदूर रेल्वे             05                   91
नांदगाव खंडेश्वर      06                  73
धारणी                   10                  75
धामणगाव रेल्वे        03                 45
वरुड                     09                115
अंजनगाव सुर्जी       07                 203
अचलपूर                07                235
शेंदुरजना घाट        06                  81
मोर्शी                     07                141
चिखलदरा              04                  44

संबंधित बातम्या

Back to top button