फडणवीस हे राज्याचे सर्वात क्रूर मुख्यमंत्री
आल्हाद कलोतीच्या बिनविरोध निवडीनंतर यशोमती ठाकूर भडकल्या

अमरावती /20 नोव्हेंबर – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बिनविरोध निवडून येण्याच्या मालिकेत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मामेभावाचाही नंबर लागला आहे. मुख्यमंत्री फडणवीसांचा मामेभाऊ अल्हाद कलोती यांची चिखलदरा नगरपरिषद निवडणुकीत नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. या बिनविरोध निवडणुकीवरुन आता राजकारण सुरु झाले आहे. काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुंडागर्दी आणि सत्तेचा दुरुपयोग करुन ही निवडणूक जिंकली असल्याचे यशोमती ठाकूर म्हणाल्या. मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती बिनविरोध- सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपरिषदेत 17 पैकी 17 जागांवर भाजप उमेदवारांचा बिनविरोध विजय झाला. त्यानंतर नगराध्यक्ष पदाची निवडणूक चुरशीची होणार असे वाटत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) उज्ज्वला थोटे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवून बाद करण्यात आला, परिणामी नगराध्यक्षपदी देखील बिनविरोध निवड झाली. त्यानंतर दोंडाईचा नगरपरिषद देखील बिनविरोध निवडल्या गेल्यामुळे चर्चेत राहिली. याच मालिकेत आता अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 10 (ब) येथील निवडणूक चर्चेत आली आहे. भाजपचे आल्हाद कलोती हे येथे नगरसेवक पदाचे उमेदवार होते. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांचे मामेभाऊ बिनविरोध निवडून आल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला. मामेभावाला विजयी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मतदारसंघात दमदाटी केली. मुख्यमंत्रीपदाचा दुरुपयोग केला. विरोधी पक्षाच्या उमेदवारांना धमक्या दिल्या, पैसे दिले, असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर म्हणाल्या की, अमरावतीमध्ये भाजप रवी राणा, नवनीत राणा यांच्या खुंट्याला बांधली आहे. देवेंद्र फडणवीस याठिकाणी दमदाटी, गुंडागर्दी करतात. मुख्यमंत्रीपदाचा सर्रास दुरुपयोग त्यांनी केला. उमेदवारांना धमक्या दिल्या, कोणाला पैसे दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या इतिहासातील सर्वात क्रूर मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातील, असेही ठाकूर म्हणाल्या. देवेंद्र फडणवीस हे हिशोबाने संविधानाची तोडफोड करत आहेत. हे योग्य नाही. त्यांच्या भाजपमध्ये ओरिजनल लोक कमी आणि भाड्याने आणलेले जास्त आहेत. आल्हाद कलोती यांचा पराभव झाला असता तर देवेंद्र फडणवीस यांची नाचक्की झाली असती, म्हणून त्यांनी दमदाटी करुन मामेभावाला बिनविरोध निवडून आणले, असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला.




