अमरावती मनपा सफाई ठेका वाद हाईकोर्टात; पुढील सुनावणी 1 डिसेंबरला

कोणार्क आणि अर्बन एनवायरो यांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह; सर्व प्रतिवाद्यांना नोटीस

नागपूर /17 नोव्हेंबर : अमरावती महानगरपालिकेच्या बहु-कोटी स्वच्छता ठेक्याभोवती निर्माण झालेला वाद आता थेट बॉम्बे हाईकोर्टाच्या नागपूर खंडपीठापर्यंत पोहोचला आहे. निविदेच्या अंतिम टप्प्यात अपात्र ठरलेल्या पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने सर्व प्रतिवाद्यांना नोटीस जारी केल्या असून पुढील सुनावणी 1 डिसेंबर 2026 रोजी घेण्यात येणार आहे. सुनावणी न्यायमूर्ती अनिल एस. किलोर आणि रजनीश आर. व्यास यांच्या खंडपीठासमोर झाली. याचिकाकर्त्यांच्या बाजूने वरिष्ठ अधिवक्ता अक्षय नाईक उपस्थित होते, तर राज्य सरकारतर्फे एजीपी एन. एस. राव यांनी युक्तिवाद केला. इतर प्रतिवाद्यांना खाजगी माध्यमातून नोटीस पाठवून त्याची सेवा पूर्ण झाल्याचे हलफनामा दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. रेड्डी कंपनीने आपल्या याचिकेत गंभीर आरोप करत म्हटले आहे की दोन प्रमुख स्पर्धक- कोणार्क इन्फ्रा आणि अर्बन एनवायरो- या कंपन्या निविदेतील पात्रता निकषांवर उतरलेल्या नाहीत. आवश्यक अनुभव, कागदपत्रे आणि तांत्रिक निकष पूर्ण न असूनही मनपाने त्यांना चुकीच्या पद्धतीने पात्र ठरवले, असा दावा करण्यात आला आहे. तांत्रिक मूल्यांकनानंतर कोणार्क, अर्बन एनवायरो आणि रेड्डी कंपनी हे तीन प्रमुख स्पर्धक शिल्लक राहिले होते. आर्थिक बोली उघडली असता कोणार्क कंपनी सर्वात कमी दर देणारी (‘एल-1’) ठरली आणि मनपाच्या वर्क-ऑर्डर प्रक्रियेला सुरूवात झाली. याच दरम्यान हा वाद उभा राहिला आणि संपूर्ण निविदा प्रक्रियेवर स्थगितीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की मनपाने कोणताही कार्यादेश दिल्यास तो आदेश या रिट याचिकेच्या अंतिम निकालाच्या अधीन राहील. तसेच कोणार्क व अर्बन एनवायरो यांच्या पात्रतेचा आधार काय होता, हे मनपाने दोन आठवड्यांत सविस्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या बहु-कोटी स्वच्छता ठेक्यामुळे अमरावतीतील स्थानिक राजकारणातही मोठी हालचाल निर्माण झाली आहे. विविध राजकीय गटांनी निविदा प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप केला असून आगामी मनपा निवडणुकांवर या प्रकरणाचा थेट परिणाम होऊ शकतो, असे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button