पक्षांतर्गत दुर्लक्षाने उसळली नाराजी

जगदीश गुप्ता यांचा रोष उफाळला; अमरावतीच्या राजकारणात नवा कलह?

अमरावती/17 नोव्हेंबर दीर्घकाळ अमरावतीच्या राजकारणात आपली वेगळी छाप निर्माण केलेले माजी पालकमंत्री आणि माजी आमदार जगदीश गुप्ता यांनी अखेर पक्षातील दुर्लक्षावर भाष्य करत नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. काही महिन्यांपासून ते सक्रिय राजकीय वर्तुळापासून दूर असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत पक्षातील स्थितीवर थेट भाष्य केले.
गुप्ता यांनी सांगितले की, पक्षाने दिलेला सन्मान मागील काही काळात कमी होत गेला, आणि काही महत्त्वाच्या बैठकीत किंवा निर्णय प्रक्रियेत त्यांना स्थान न मिळाल्याने त्यांच्यात बेचैनी वाढली. लोकांनी मला वारंवार निवडून पाठवले, पक्षासाठी राबलो; पण अलीकडे माझ्या अनुभवाकडे दुर्लक्ष होत असल्याची जाणीव झाली, असे ते म्हणाले. गुप्ता यांनी सूचित केले की, स्थानिक आणि विभा गीय नेत्यांशी संवाद कमी झाला आहे. राजकारणात मतभेद असतात, परंतु संवाद तुटू नये. अनेक विषयांवर माझा सल्ला मागितला जात नाही, हे पाहून मनात प्रश्न निर्माण होतात, अशी त्यांची खुली प्रतिक्रिया होती. त्यांनी असेही सांगितले की काही प्रसंगी अनुभवी नेतृत्वापेक्षा गटबाजीला प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गट-गटांच्या समीकरणात मला जेव्हा जाणीवपूर्वक दूर ठेवले जाऊ लागले, तेव्हा परिस्थितीकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक वाटले, असे गुप्ता यांनी नमूद केले.
पत्रकार परिषदेत गुप्ता यांनी ही बाबही मांडली की, काही कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी संपर्क कमी केला आहे. ज्यांना आपण खांद्यावर उचलून पुढे आणलं, तेच संपर्क टाळू लागले, हे पाहून मनाला वेदना होतात. ही फक्त वैयक्तिक खंत नाही, तर पक्षाच्या अंतर्गत वातावरणाविषयीही प्रश्न उपस्थित करणारी बाब आहे, असे ते म्हणाले. अमरावतीसह संपूर्ण जिल्ह्यातील आगामी निवडणुका लक्षात घेता पक्षातील प्रत्येक हालचालीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष असताना, गुप्ता यांच्या नाराजीमुळे निर्माण झालेली परिस्थिती अधिक महत्त्वाची ठरत आहे. गुप्ता यांनी स्पष्ट केले की, आगामी राजकीय निर्णय घेताना ते ‘सन्मान’ हा निकष सर्वाधिक महत्त्वाचा मानतील. माझ्या राजकीय प्रवासात अनेक चढउतार आले; परंतु सन्मान हा कधीही तडजोडीचा विषय नव्हता. पुढील राजकीय भूमिका ठरवताना हाच मुद्दा निर्णायक ठरेल, असे त्यांनी म्हटले. गुप्ता यांच्या या वक्तव्याने पक्षातही चर्चा सुरू झाल्याचे वृत्त आहे. काही स्थानिक नेतृत्वाने परिस्थिती सुधारण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी काही कार्यकर्त्यांकडून होतेय. अमरावतीच्या मतदारसंघात गुप्ता आजही लोकप्रिय असल्याने त्यांच्या नाराजीमुळे पक्षाला होऊ शकणार्‍या राजकीय तोट्याचाही विचार सुरू झाल्याचे जाणकार सांगतात. गुप्ता यांच्या नाराजीमुळे विभागीय राजकारणात नव्या शक्यता आणि नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. काही राजकीय नेते त्यांच्याशी संपर्कात असल्याचीही कुजबुज ऐकू येत आहे. आगामी काळात गुप्ता कोणते पाऊल उचलतात, यावरच अमरावतीच्या राजकारणातील अनेक निर्णय अवलंबून राहणार असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button