10 नगराध्यक्ष आणि 116 नगरसेवकांचे नामांकन दाखल
चांदूरबाजारमध्ये पक्षांची झुंबड-सत्ता कोणाच्या झोळीत?

* सातकोनी लढतीने सत्तेची कुरघोडी
* प्रहारच्या शेवटच्या खेळीने वातावरण तापले
चांदूरबाजार /17 नोव्हेंबर – नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीने शहर सोमवारच्या (दि.17) पहाटेपासूनच ढवळून निघाले. नामांकनाचा शेवटचा दिवस असल्याने नगरपरिषद कार्यालय परिसरात उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी अक्षरशः मेळा भरवला होता. डीजे, मोटारसायकल रॅली, बँनरबाजी, हातात पक्षाचे झेंडे – अशा राजकीय रंगमंचाने संपूर्ण शहराला निवडणुकीचे भरते पाणी आले. सतत दोन दिवस विविध पक्षांमध्ये सुरू असलेल्या उमेदवार निवड बैठका, तणावपूर्ण चर्चासत्रे आणि रात्री उशीरा पर्यंत उमेदवारांच्या भेटीगाठींनंतर शेवटच्या दिवशी मोठे निर्णय झाले. त्यामुळे अर्ज दाखल करण्याची धांदल शेवटच्या क्षणापर्यंत सुरूच राहिली. शेवटच्या दिवशीच उमेदवारांचा ओघ एवढा प्रचंड होता की नगरपरिषद कार्यालयाबाहेर वाहतूक कोंडी झाली. दिवसभरात नगराध्यक्ष पदासाठी 10 अर्ज, तर नगरसेवक पदासाठी तब्बल 116 अर्ज दाखल झाले. ही संख्या पाहता चांदूरबाजारमध्ये यंदाची निवडणूक इतिहासातली सर्वाधिक चुरशीची ठरणार हे स्पष्ट झाले आहे. रविवारीच काही पक्षांनी स्वतःचे उमेदवार जाहीर करून अगोदर अर्ज दाखल केले होते; मात्र प्रहार जनशक्तीने शेवटच्या दिवशीच मैदानात उतरून सर्वांना धक्का दिला. त्यांच्या उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जामुळे वातावरण आणखी तापले. शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करणार्या प्रमुख उमेदवारांत भाजपच्या कांताबाई अहिर ह्या भाजपचा गड म्हणून ओळखल्या जाणार्या काही प्रभागांत या उमेदवाराकडे आशेने पाहिले जात आहे. पक्षाने शेवटच्या क्षणी उमेदवारावर शिक्कामोर्तब केल्याने भाजपमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. तर काँग्रेसच्या फरहाणा तबस्सुम साजिद ह्या अल्पसंख्याक मतदारांमध्ये मजबूत पकड असलेल्या काँग्रेसने साकारलेल्या या समीकरणामुळे सत्तेसाठी काँग्रेस गंभीर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) च्या फातिमाबानो सलिम सरकार ह्या अजित पवार गटाची शहरात चांगली संघटना फातिमाबानो यांच्या नावावरून पक्षात एकसंघता निर्माण झाल्याचे दिसते. तसेच प्रहार जनशक्ती पक्षाच्या मनीषा मनीष नागलीया यांना प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व माजी मंत्री व आमदार बच्चू कडू यांनी आपल्या बालेकिल्यात नवीन खेळी खेळून शेवटच्या दिवशी उमेदवार मैदानात उतरल्याने राजकीय गणित बदलले. त्यांच्या उमेदवारीमुळे काही प्रभागांतील मतांची विभागणी नक्कीच होईल. अस नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाच्या सरोज अरुण चौधरी हे शिवसेनेच्या उबाठा गटाने या निवडणुकीत आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न सुरू केला असून सरोज चौधरी यांच्या नावाने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साह. तसेच पाच अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरल्याने लढत पंचकोनीवरून सातकोनी झाली आहे.
नगराध्यक्ष पदाचे प्रमुख दावेदार-भाजप – कांताबाई अहिर, काँग्रेस – फरहाणा तबस्सुम साजिद, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – फातिमाबानो अ. सलीम सरकार, प्रहार जनशक्ती – मनीषा मनीष नागलीया, शिवसेना (उबाठा) – सरोज अरुण चौधरी, इतर पाच अपक्ष उमेदवारांनीही अर्ज दाखल करून चित्र अधिक रंगतदार केले.




