…तर चित्रपटगृह ओस पडतील
पाण्याच्या बाटलीचे 100 रुपये दर निश्चित केले

* मल्टिप्लेक्समधील अवाजवी दरांबाबत न्यायालयाने व्यक्त केली चिंता
नवी दिल्ली/4 नोव्हेंबर : तुम्ही पाण्याच्या बाटलीसाठी 100 रुपये, कॉफीसाठी 700 रुपये आकारता. सिनेमागृहे कमी होत असल्याने लोकांनी येऊन आनंद घेणे अधिक वाजवी बनवा, अन्यथा चित्रपटगृहे ओस पडतील, अशी चिंता सोमवारी (दि. 3) सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली.
तिकिटांचे दर 200 रुपयांपर्यंत मर्यादित ठेवावेत, असा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला होता. या निर्णयाला कर्नाटक उच्च न्यायालयाने स्थगिती दिली, मात्र काही अटींचे पालन करण्याचे निर्देश दिले होते. याविरोधात ‘मल्टिप्लेक्स असो सिएशन ऑफ इंडिया’ आणि इतरांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मल्टिप्लेक्समधील अवाजवी दरांबाबत न्यायमूर्ती नाथ यांनी तोंडी चिंता व्यक्त केल्यानंतर ‘मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया’च्या वतीने युक्तिवाद करताना ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले, ताज कॉफीसाठी 1000 रुपये आकारेल. यामध्ये तुम्ही दुरुस्ती करू शकाल का? ही निवडीची बाब आहे. ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी ही निवडीची बाब आहे, असा युक्तिवाद केल्यानंतर न्यायमूर्ती नाथ यांनी स्पष्ट केले की, देशात सिनेमागृहांची संख्या कमी होत आहे. चित्रपटगृहात लोकांनी येऊन आनंद घ्यावा, यासाठी येथील दर परवडतील असे ठेवा, अन्यथा सिनेमागृहे ओस पडतील.




