दिवाळीची स्नेह भेट चिल्लर म्हणुन जनतेचा अनादर

युवा स्वाभिमानचा पत्रकार परिषदेत यशोमती ठाकूर यांच्यावर निशाणा

अमरावती /28 ऑक्टोबर:   दिवाळी हा उत्सवाचा सण नात्यात गोडवा निर्माण करण्याचा, भाऊ-बहिणीचे नाते घट्ट करण्याचा आणि एकमेकांना शुभेच्छा देण्याचा सण आहे. त्याच अनुषंगाने बडनेरा मतदारसंघाचे आमदार रविभाऊ राणा हे दरवर्षी लाखो शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य जनता आणि कष्टकरी भाऊ-बहिणींना दिवाळीचा आनंद उत्सव म्हणून त्यांची दिवाळी गोडव्याने साजरी करण्याच्या दृष्टीने घरोघरी, गावोगावी जाऊन दिवाळीचा किराणा आनंदाने देत असतात. यावर्षीदेखील, दरवर्षीप्रमाणे, अमरावती जिल्ह्यातील खासदार बळवंत वानखेडे, सर्व आजी-माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, अधिकारी आणि सर्व प्रतिष्ठित नागरिकांना दिवाळी फराळाची भेट, किराणा किट आणि फराळाच्या भेटवस्तू देण्यात आल्या. त्याच अनुषंगाने आ. रविभाऊ राणा यांनी माजी मंत्री यशोमतीताई ठाकूर यांच्याकडे दिवाळी फराळाची भेट आणि किराणा किट मोठ्या बहिणीला भेट म्हणून पाठवली होती. मात्र, यशोमतीताईंनी त्या भेटीचा अपमान करून एक व्हिडीओ प्रसारमाध्यमांकडे पाठविला. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी आ. रविभाऊ राणा यांना उद्देशून “किराणा वाटप करणे हा चिल्लर धंदा आहे” असे म्हटले.

त्यावर प्रतिक्रिया देताना समर्थकांनी म्हटले की, होय ताई, तुम्ही प्रतिष्ठित घराण्याची मुलगी, हजारो एकर शेती असलेल्या जमीनदाराची मुलगी आहात. तुम्हाला जर किराणा वाटप “चिल्लर धंदा” वाटत असेल, तर शहरात आणि खेड्यांमध्ये जाऊन पाहा — गरीबांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद दिसतो आहे. तसेच, तुम्ही रविभाऊ राणांच्या वडिलांचा अपमान केला की “तुमचा बाप बारदाने शिवत होता, हमाली करत होता.” हो, यशोमती ताई, फरक आहे — तुमचे वडील जमीनदार होते आणि रविभाऊ राणा हे एका हमाली करणाऱ्या गरीब बापाचे पुत्र आहेत. तुम्हाला गरिबीची जाणीव नाही. ज्या बारदाने शिवणाऱ्या बापाचा मुलगा चार वेळा या गोरगरिब जनतेने आमदार बनविला, त्याच जनतेचा तुम्ही अपमान करत आहात.

मागील 20 वर्षांपासून दोन लाख शेतकरी व शेतमजूर बंधु-भगिनींना हेच किराणा किट वाटप केले जाते. एक गरीब भाऊ म्हणून आ. रविभाऊ राणा यांनी यशोमती ताईंना दिवाळीचा शुद्ध तुपामध्ये बनविलेला फराळ आणि साडी भेट पाठवली. ज्याबाबत त्यांनी “100 रुपयांची साडी” असा उल्लेख केला, ती प्रत्यक्षात 1000 ते 1500 रुपयांची असून, होलसेलमध्ये 500 रुपयांना आणली जाते. हाच भावाने दिवाळीच्या साडी-चोळ्या भगिनींना भेट दिल्या जातात.

याशिवाय, जेव्हा रविभाऊ राणा शेतकऱ्यांसाठी स्वतःची दिवाळी जेलमध्ये “काळी दिवाळी” म्हणून साजरी करत होते, तेव्हा यशोमती ताई या राज्याच्या मंत्री होत्या, पण त्यांना शेतकऱ्यांची आठवण झाली नाही. शेतकऱ्यांसाठी रविभाऊ राणा अनेकदा जेलमध्ये गेले, पण तरी त्यांच्यावर उद्धव ठाकरे सरकारने आणि यशोमती ताईंनीच 14 दिवस तुरुंगात ठेवले. बडनेरा मतदारसंघात एखादे चांगले पर्यटन स्थळ उभे राहत असेल किंवा देवदेवतांची मूर्ती स्थापन होत असेल, तरी यशोमती ताई विरोध करतात — देवालाही सोडत नाहीत.

त्यामुळे जनता येत्या काळात त्यांना जागा दाखवून देईल, असा विश्वास समर्थकांनी व्यक्त केला. रविभाऊ राणांविषयी द्वेष बाळगणाऱ्या आणि त्यांनी दिलेल्या दिवाळीच्या किराणा किट, साडी-चोळी आणि अन्नाचा अपमान करणाऱ्या यशोमती ताईंच्या मानसिकतेचा जाहीर निषेध करण्यात आला. या वेळी बाळासाहेब इंगोले पाटील, विनोद गुहे, मिलिंद कहाले, गणेशदास गायकवाड, सोनाली नवले, अर्चना तालन, साक्षी उमक पाटील आणि संगीता काळबांडे उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button