आज तिरंगा झेंड्यांच्या गजरात बेलोराहून निघणार ‘महाएल्गार’ मोर्चा

शेतकर्‍यांच्या हक्कासाठी उद्या नागपुरात देणार धडक

* माजी राज्यमंत्री बच्चू कडू स्वत: टॅक्टर चालवून करणार नेतृत्व
* शेतकरी, दिव्यांग, मेंढपाळासह अनेकांचा सहभाग
* महाराष्ट्रातील सर्व शेतकरी नेते एकत्र

चांदूरबाजार/26 ऑक्टोबर – शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी, शेतमालाच्या हमीभावासाठी, दिव्यांगांना सहा हजार रुपयांच्या मानधनासाठी तसेच मेंढपाळ आणि मच्छीमारांच्या न्याय्य हक्कांसाठी ‘महाएल्गार आंदोलनाची’ सुरुवात उद्या, 27 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी बेलोरा येथून होत आहे. स्वतः राज्यमंत्री बच्चू कडू ट्रॅक्टर चालवून नेतृत्व करणार आहेत. बेलोरा–आडगाव–यावली शहीद–मार्डीमार्गे वर्धा येथे मुक्काम घेत हे आंदोलन 28 ऑक्टोबर रोजी नागपूर बुटीबोरी येथे धडकणार आहे. रॅलीतील प्रत्येक ट्रॅक्टर जय जवान, जय किसान आणि तिरंगा झेंडा फडकवत स्वाभिमानाच्या घोषणांनी गजबजणार आहे.

शेतकरी, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार सार्‍यांच्या हक्काचा हा एल्गार असून, या रॅलीत हजारो ट्रॅक्टर, बैलबंड्या आणि मेंढपाळ बांधवांचा सहभाग आहे. मेंढ्या, शेळ्या, बैलबंडी घेऊन हे सर्व जण बच्चू कडूंच्या सोबत नागपूरच्या दिशेने निघणार आहेत. दरम्यान, सोलापूरहून 20,000 भाकऱ्या, मिरची आणि शेंगदाण्याचा खरडा, नाशिकहून कांदा व भाजीपाला, लातूरहून तूरडाळ आणि इतर भागांतून हुरडा व अन्नधान्य पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गावोगाव चिवडा बनवण्याचे काम सुरू असून संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र एकसंध तयारीत उतरला आहे.

सरकारच्या घोषणांवर रोष असून ‘कोरा सातबारा अजून कोरा!’ असा संताप व्यक्त होत आहे. ‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू’ अशी घोषणा देऊन सत्तेत आलेल्या सरकारने आजतागायत शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही. ना कर्जमाफी, ना हमीभाव — उलट केंद्र सरकारच्या चुकीच्या आयात–निर्यात धोरणामुळे शेतकरी आर्थिक संकटात कोसळला आहे. कापसाची आयात वाढल्याने देशांतर्गत भाव कोसळले आहेत, तर सोयाबीनचा किमान आधारभूत भाव 5335 रुपये असतानाही शेतकऱ्यांना फक्त 500 ते 3000 रुपयांदरम्यान विक्री करावी लागते. “हा कोणता आत्मनिर्भर भारत?” असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या तोंडी आहे.

पूर्वीच्या आंदोलनांची झंझावाती परंपरा लक्षात घेतल्यास बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली याआधीही राज्य हलवणारी अनेक आंदोलनं झाली आहेत — रायगडाच्या पायथ्याशी तीन दिवसांचा अन्नत्याग, लोकप्रतिनिधींच्या घरावर टेंबा आंदोलन, मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सान्निध्यात सात दिवसांचा अन्नत्याग, डॉ. भाऊसाहेब देशमुखांच्या पवित्र भूमीतून पापड ते चिलगव्हाण पायदळ वारी आणि महाराष्ट्रभर 4,900 किमीची शेतकरी हक्क यात्रा. तरीही शासनाने शेतकऱ्यांच्या बाजूने ठोस पाऊल उचललेले नाही. म्हणूनच यावेळी हा एल्गार आरपारचा आहे!

* आंदोलन मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्याची मनधरणी

बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली असून, आंदोलन मागे घेण्यासाठी बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरून संवाद साधला आहे. याबाबत बच्चू कडू सामेवरील कार्यकर्त्यांशी चर्चा करून काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button