अखेर विज वितरण कंपनीच्या कर्मचार्याविरुध्द गुन्हा
शेतकरी व दोन बैलांच्या मृत्यू प्रकरणी

वरुड । 24 ऑक्टोबर – येथून जवळच असलेल्या बेसखेडा येथे 2 ऑगस्ट 2025 रोजी विद्युत शॉक लागून शेतकऱ्यासह दोन बैलांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी अखेर वरुड पोलिसांनी हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणा केल्याच्या कारणावरून फिर्यादीच्या तक्रारीवरून वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हर्षल श्रीरामजी घोरसे (वय 30) यांचे वडील श्रीराम बळीराम घोरसे हे 2 ऑगस्ट रोजी बैलजोडी डवरण्यासाठी निघून गेले होते. त्यांच्या मागोमाग त्यांची आईही डबा घेऊन सकाळी 10.30 वाजता गेली. त्यावेळी हर्षल यांच्या आईने त्यांना फोन करून सांगितले की, तुझ्या वडिलांना इलेक्ट्रिक तार तुटल्याने शॉक लागला आहे तसेच आपल्या दोन बैलांना देखील शॉक लागून ते जागीच मरण पावले आहेत. शेतातील लो लटकलेल्या ताराबाबत लाईनमन अक्षय वानखडे यांना वारंवार माहिती देऊनही त्यांनी ती दुरुस्त केली नव्हती. त्या तुटलेल्या विद्युत तारेमुळेच माझे वडील आणि दोन बैल जागीच मरण पावले. माझ्या वडिलांच्या आणि दोन बैलांच्या मृत्यूस लाईनमनच्या हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणाचाच कारणीभूत असल्याचे फिर्यादी हर्षल श्रीराम घोरसे (रा. बेसखेडा) यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. यावरून पोलिसांनी अक्षय वानखडे (वय 38) यांच्या विरोधात हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणाबद्दल कलम 106(1), 325 बी.एन.एस. अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास ठाणेदार अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.




