मेळघाटच्या शेतकर्यांचे मक्याच्या हमीभावासाठी आंदोलन
परतवाड्यात विविध कार्यालयांवर धडक

* तहसीलदारांनी स्वीकारले निवेदन
अमरावती /23 ऑक्टोबर – केंद्र सरकारने निश्चित केलेल्या 2400 रुपये प्रतिक्विंटल हमीभावाची मागणी करत मेळघाटातील मका उत्पादक शेतकर्यांनी 23 ऑक्टोबर, गुरुवारी अचलपूर-परतवाडा येथे पदयात्रा काढली. या पदयात्रेत शेतकर्यांनी विविध शासकीय कार्यालयांवर धडक दिली. डॉ. बंड्या साने, रामबाबू दहीकर, रामदास भिलावेकर आणि अविनाश बेलसरे यांनी मेळघाटातील आदिवासी व इतर समाजबांधवांसह या आंदोलनाचे नेतृत्व केले. परतवाडा येथील विश्रामगृहापासून आंदोलनाची सुरुवात झाली आणि गुजरी बाजार, जयस्तंभ चौक व बसस्थानक मार्गे आंदोलनकर्ते कृषी उत्पन्न बाजार समिती व अचलपूरच्या उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालयापर्यंत पोहोचले. काही कार्यालये बंद असली तरी, शेतकर्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आणि फलक झळकावून आपला मुद्दा मांडला.
शेतकर्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती चिमोटे व उपविभागीय अधिकार्यांच्या आदेशानुसार तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदारांना निवेदन सादर केले. त्यांनी आरोप केला की, भारत सरकारने मक्यासाठी 2400 रुपये प्रतिक्विंटल दर घोषित केला असतानाही प्रत्यक्षात शेतकर्यांना मातीमोल भाव मिळत आहेत. निवेदनातून मागणी केली की, मक्याची खरेदी शासकीय दरानुसार व्हावी. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीला घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र उपसभापती चिमोटे यांनी निवेदन स्वीकारून योग्य पाठपुरावा करण्याचे आदेश दिले.
आंदोलनकर्त्यांनी मका पिकाला 2400 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव मिळावा तसेच मशीनद्वारे ओलसरपणाची तपासणी न करता व्यापार्यांकडून होणारी मनमानी थांबवावी, या प्रमुख मागण्या मांडल्या. विशाल भूसुम, लक्ष्मण धांडे, जवाहर मावस्कर, जयकिसन मावस्कर, अनिल मावस्कर, ओंकार कासदेकर, करण अखंडे, डॉ. दशरथ बावणकर, उषा बेलसरे, सोनू भुसारे, सुमित्रा आहाके यांच्यासह अचलपूर व मेळघाटातील सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. स्थानिक पातळीवर दोनदा आंदोलन करूनही परिस्थिती न सुधारल्यामुळे, मका उत्पादकांनी आता जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त कार्यालयाकडे लक्ष वेधले आहे. त्यानुसार, 24 ऑक्टोबर, शुक्रवारी हे आंदोलनकर्ते जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना भेटून आपले निवेदन सादर करतील आणि त्यानंतर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत.




